नाशिक बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 01:02 AM2018-07-25T01:02:35+5:302018-07-25T01:03:03+5:30
औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
नाशिक : औरंगाबादसह मराठवाड्यात मराठा क्रांती आंदोलनाला हिंसक वळण लागलेले असल्याने नाशिकमध्येही सकल मराठा समाजातर्फे बुधवारी (दि.२५) नाशिक जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने मंगळवारी सर्व प्रांताधिकारी व तहसीलदारांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या मदतीने मिळणाऱ्या गुप्त सूचनांच्या आधारे रात्री उशिरापर्यंत खबरदारीची उपाययोजना करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने मंगळवारी (दि.२४) दिली. नाशिक जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक आंदोलनाची तयारी करून जिल्हा बंदची हाक दिली असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनाला गोपनीय सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तहसीलदार व प्रांताधिकाºयांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नाशिक बंद आणि औरंगाबाद जिल्ह्यात सुरू असलेल्या आक्रमक आंदोलनामुळे औरंगाबाद-नाशिक बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या असून, नाशिक जिल्ह्यातही ज्या भागात आक्रमक आंदोलन होईल त्या भागातील बससेवा बंद ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आल्याचे समजते.
गोदावरी नदीकिनारी जीवरक्षक तैनात
राज्यभरात मराठा क्रांती मोर्चाचे आक्रमक आंदोलन सुरू असताना मंगळवारी नाशिकमध्येही एका तरुणाने गोदावरी पात्रात उतरून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या प्रकाराची गंभीर दखल घेतली असून, गोदावरी परिसरात १० जीवरक्षक पथक तैनात केले आहेत. प्रत्येक पथकात दोन अशा एकूण २० जवानांना आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी लाइफ जॅकेटसह सर्व साहित्य उपलब्ध करून देण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.