जिल्हा प्रशासन म्हणते केवळ १८ टन तुटवडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:17 AM2021-04-23T04:17:12+5:302021-04-23T04:17:12+5:30
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीइतका पुरवठा होत ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही मोठी वाढ झाली आहे. मात्र, मागणीइतका पुरवठा होत नसल्याने आम्ही जिल्ह्यातील ऑक्सिजनचा अतिरेकी वापर, गळती रोखण्याच्या उपाययोजना केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या मागणीच्या तुलनेत केवळ १८ मेट्रिक टन ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
नाशिक जिल्ह्यामधून गत आठवड्यात १३८ मेट्रिक टनची मागणी होती. ही मागणी कमी करून आपण १२१ मेट्रिक टनवर आणली आहे. त्यानंतर दवाखान्यातील गळती, अतिवापर टाळून ती आपण १०३ मेट्रिक टनवर आणली होती. मात्र, प्रत्यक्षात आपल्याला पुरवठा हा ८५ मेट्रिक टन इतकाच होत आहे. त्यामुळे १८ टनचा तुटवडा जाणवत असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले. बुधवारी काही हॉस्पिटलच्या बाबतीत तुटवडा निर्माण झाला असून, सध्याची अडचण दूर करण्याची ऑक्सिजन वितरकांना सूचना केली असून, दुपारपर्यंत हा प्रश्न मार्गी लागेल, असे त्यांनी सांगितले. ऑक्सिजनटंचाईवर सगळ्यांनी मिळून मात करायला हवी. ऑक्सिजचा वापर फक्त फार्मास्युटिकल कंपन्यांनी करण्याच्या सूचनादेखील देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.
इन्फो
जिल्ह्यात ७ हजार रुग्ण ऑक्सिजनवर
जिल्ह्यात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांची संख्या सुमारे ७ हजार इतकी आहे. आठवडाभरात थोड्या कमी- अधिक प्रमाणात असलेले हे रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत. प्राप्त माहितीनुसार अनेक रुग्णालयांत १३० लिटर प्रतिमिनिट, असा वापर रुग्णालयांत होत आहे. त्यामुळे या रुग्णालयांनी ऑक्सिजनचा कमी प्रमाणात वापर करावा. गळती दुरुस्ती करून ऑक्सिजनचा अपव्यय रोखावा, असे आवाहन करण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.