जिल्हा प्रशासनाकडून ठेवीदार वाऱ्यावर
By admin | Published: May 29, 2016 10:29 PM2016-05-29T22:29:00+5:302016-05-29T22:46:00+5:30
आढावा बैठक ठप्प : दीड वर्षांपासून लागेना मुहूर्त
नाशिक : जिल्ह्यातील अडचणीत आलेल्या बॅँक आणि ठेवीदारासंदर्भात जिल्हा पातळीवर असलेल्या सहकार विषयक समितीची बैठक गेल्या दीडवर्षांपासून झालेली नसून त्यामुळे गुंतवणूकदार वाऱ्यावर आहेत.
जिल्ह्यातील पिपल्स बॅँकेवर सर्व प्रथम आर्थिक निर्बंध लादण्यात आले आणि अडचणीतील या बॅँकेपाठोपाठ अनेक बॅँका अडचणीत आल्या. या बॅँकावर निर्बंध घालण्यात आले असले तरी प्रत्यक्षात हे निर्बंध बॅँकेच्या खातेदार आणि ठेवीदारांवर असून, त्यांना त्यांच्या हक्काची रक्कम बँकेतून परत मिळत नसल्याने ठेवीदार हवालदिल आहेत. श्रीराम बॅँकेवर तर अवसायक नियुक्त होऊनही ठेवीदारांना त्यांची रक्कम मिळालेली नाही.
कपालेश्वर, क्रेडिट कॅपिटल तसेच अन्य अनेक पतसंस्था मोडीत निघाल्याने त्यांच्या ठेवीदारांचे हाल झाले त्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरावर ठेवीदारांच्या हितासाठी आणि बॅँका, पतसंस्थांच्या मनमानीपणाला चाप लावण्यासाठी जिल्हा प्रशासन बैठका घेऊन आढावा घेत असे, परंतु गेल्या दीड वर्षात अशा प्रकारच्या बैठकाच झालेल्या नसल्याचे या समितीचे सदस्य पां. भा. करंजकर यांनी सांगितले.
नोव्हेंबर २०१४ मध्ये एक बैठक झाली. त्यानंतर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीत जिल्हाधिकारी व्यस्त असल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांची बदली झाली तरी एकही बैठक त्यांनी घेतली नाही. त्यामुळे शहरातील शेकडो गुंतवणूकदारांचे प्रश्न ‘जैसे थे’ आहेत.
अशाच प्रकारे कुशवाह यांनी भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता समितीच्या बैठकाही अपवादानेच घेतल्या आहेत. (प्रतिनिधी)