जिल्हा बॅँक : सीसीटीव्ही, तिजोरी खरेदी प्रकरण
By admin | Published: July 10, 2017 11:34 PM2017-07-10T23:34:27+5:302017-07-10T23:34:48+5:30
संचालकांची सुनावणी २९ जुलैला
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे लोखंडी तिजोरी खरेदी प्रकरण, सीसीटीव्ही खरेदी प्रकरण, नोकर भरती प्रकरणासह अन्य चार मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य सहकार अधिनियम कलम ८८ नुसार सुरू असलेल्या चौकशीप्रकरणी सोमवारी (दि. १०) जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्यासमोर जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह संचालकांनी उपस्थिती लावली.
दरम्यान, जिल्हा बॅँक संचालकांनी याप्रकरणी बाजू मांडण्यास मुदत मागितल्याने यापुढील सुनावणी आता २९ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. जिल्हा बॅँकेच्या वतीने अध्यक्ष नरेंद्र दराडे, संचालक परवेज कोकणी, माणिकराव कोकाटे, शिरीषकुमार कोतवाल, केदा अहेर, गणपतराव पाटील आदी संचालकांनी जिल्हा उपनिबंधक कार्यालयात उपस्थित राहत जिल्हा बॅँकेची बाजू मांडण्यासाठी मुदतवाढ मिळण्याची मागणी केली. त्यानुसार पुढील सुनावणी २९ जुलै रोजी ठेवण्यात आली आहे. यावेळी जिल्हा बॅँकेच्या वतीने जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांना आजी-माजी २१ संचालकांच्या स्वाक्षरीचे पत्र देण्यात आले. काही दिवसांपूर्वीच जिल्हा बॅँकेतील आर्थिक अनियमितता प्रकरणी जिल्हा बॅँक अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह २१ संचालकांना सीसीटीव्ही खरेदी, लोखंडी तिजोरी खरेदी, नोकर भरती आदींसह चार मुद्द्यांवर जिल्हा बॅँकेचे आर्थिक नुकसान केल्याचा ठपका ठेवत कलम ८८ अन्वये आर्थिक अनियमिततेला जबाबदार धरून कोट्यवधी रुपयांची वसुली काढण्यात आली आहे. त्याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे यांच्या कक्षात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. कलम ८८ नुसार संचालकांकडून वसुली झाल्यास जिल्हा बॅँकेवर बरखास्तीचे ढग दाटण्याची चिन्हे आहेत.