जिल्हा बॅँक अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

By admin | Published: May 11, 2017 12:58 AM2017-05-11T00:58:01+5:302017-05-11T00:58:13+5:30

नाशिक : शासन दरबारी प्रयत्न करूनही अपेक्षित यश प्राप्त होत नसल्याचे जिल्हा मध्यवर्ती बॅँकेच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय बोलून दाखविला

District bank chairman resigns | जिल्हा बॅँक अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

जिल्हा बॅँक अध्यक्ष राजीनाम्याच्या तयारीत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : चोहोबाजूंनी आर्थिक कोंडीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बॅँकेची त्यातून सुटका करण्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करूनही अपेक्षित यश प्राप्त होत नसल्याचे पाहून निराश झालेल्या बॅँकेच्या अध्यक्षांनी पदाचा राजीनामा देण्याचा मनोदय बोलून दाखविला असून, येत्या दोन-तीन दिवसांत मुख्यमंत्र्यांसमवेत होणाऱ्या बैठकीनंतर राजीनाम्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्याचे त्यांनी ठरविले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय जाहीर केल्यापासून जिल्हा बॅँक आर्थिक अडचणीत सापडली असून, नोटा बदलण्याच्या रिझर्व्ह बॅँकेने दिलेल्या निर्णयानुसार ३४२ कोटी रुपयांच्या नोटा बॅँकेने बदलून दिल्या आहेत. या जुन्या नोटा बॅँकेकडे अद्याप तशाच पडून असल्यामुळे बॅँकेचे ६८४ कोटी रुपयांचे भांडवल अडकून पडले आहे. त्याचबरोबर बॅँकेची गुंतवणूक व भागभांडवलाच्या प्रमाणावर शासनाकडून नोटा उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने शिक्षकांचे वेतन करण्यात अडचणी आल्या आहेत, शिवाय शासनाकडून कर्जमाफीच्या अपेक्षेवर असलेल्या शेतकऱ्यांकडून पीककर्जाचा भरणा न झाल्याने सुमारे २७०० कोटी रुपये अडकून पडले आहेत. अशा परिस्थितीत बॅँक चोहोबाजूंनी कोंडीत पकडली गेली आहे.
राज्य शासनाने आर्थिक मदत केल्याशिवाय जिल्हा बॅँकेचा गाडा सुरळीत होऊ शकणार नसल्याने जिल्हा बॅँकेच्या संचालकांनी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या कानी हकिकत कथन करून तोडगा काढण्याची विनंती केली असून, यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक घेण्याचे ठरले, तथापि मुख्यमंत्र्यांशी यासंदर्भात सविस्तर चर्चा होऊ शकलेली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर नैराश्य आलेले जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी बॅँकेचे प्रश्न सुटत नसल्याने राजीनामा देण्याची तयारी केली आहे. ‘लोकमत’शी बोलताना दराडे यांनी बॅँकेची आर्थिक परिस्थिती विशद केली.

Web Title: District bank chairman resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.