जिल्हा बॅँकेचे संचालक जेटली यांना भेटणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2018 01:40 AM2018-02-24T01:40:53+5:302018-02-24T01:40:53+5:30
नोटाबंदीच्या दिवशी बॅँकेत जमा झालेली रक्कम बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सात जिल्हा बँकांच्या संचालकांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले असून, यातील बहुतांशी जिल्हा बॅँकांचे अध्यक्ष भाजपाचेच असल्यामुळे जेटली यांनीही त्यांना भेटीसाठी ७ मार्चची वेळ दिली आहे.
नाशिक : नोटाबंदीच्या दिवशी बॅँकेत जमा झालेली रक्कम बदलून देण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या राज्यातील सात जिल्हा बँकांच्या संचालकांनी थेट केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले असून, यातील बहुतांशी जिल्हा बॅँकांचे अध्यक्ष भाजपाचेच असल्यामुळे जेटली यांनीही त्यांना भेटीसाठी ७ मार्चची वेळ दिली आहे. त्यामुळे जिल्हा बॅँकेच्या आशा पल्लवित झाल्या असून, यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल असलेल्या याचिकेच्या निकालाकडेही त्यांचे लक्ष लागले आहे. रिझर्व्ह बॅँकेने काही दिवसांपूर्वीच यासंदर्भात जिल्हा बॅँकांना पत्र पाठवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चलनातून हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बाद करण्याची घोषणा केली त्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी बॅँकांमध्ये आर्थिक व्यवहारापोटी जमा झालेल्या हजार व पाचशे रुपयांच्या नोटा बदलून देण्यास नकार दिला आहे. नाशिक जिल्हा बॅँकेत त्या दिवशी क्लोजिंग बॅलन्स म्हणून २१ कोटी रुपयांच्या नोटा होत्या. त्यामुळे रिझर्व्ह बॅँकेने यासंदर्भात घेतलेल्या भूमिकेचा बॅँकेला आर्थिक फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली. नाशिकप्रमाणेच पुणे, नगर, कोल्हापूर, सांगली, नागपूर, वर्धा या जिल्हा बॅँकांनाही त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे सर्व जिल्हा बॅँकांच्या अध्यक्ष व संचालकांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेण्याचे ठरविले व त्यानुसार येत्या ७ मार्च रोजी दिल्लीत ही भेट होऊन त्यात पैशांची मागणी केली जाणार असल्याचे जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांनी ‘लोकमत’ला सांगितले.