जिल्हा बॅँक अविश्वास : पीक कर्जाचे धनादेश वटेनात
By admin | Published: September 14, 2016 12:27 AM2016-09-14T00:27:46+5:302016-09-14T00:28:09+5:30
सर्वसाधारण सभेपर्यंत अध्यक्षांना अभय?
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पदाधिकारी ‘खांदेपालटासाठी’ बहुतांश संचालक सक्रिय झालेले असतानाच ९७ व्या घटनादुरुस्तीनुसार अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवड ही पाच वर्षांसाठी असल्याने या गोष्टीचा लाभ घेण्याच्या दृष्टीने व्यूहरचना आखण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यातच २० सप्टेंबर रोजी बॅँकेची सर्वसाधारण सभा होत असून, ही सभा विद्यमान अध्यक्षांची अध्यक्षपदाची शेवटची सभा ठरण्याचीही शक्यता काही संचालकांनी खासगीत बोलताना व्यक्त केली आहे.
दरम्यान, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे प्रकृती स्वाथ्यामुळे अस्वस्थ असल्याचे समजते; मात्र संचालकांनी सर्वानुमते सांगितले तर आपण चार-सहा महिन्यांत राजीनामा देऊ, असे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी सांगितले.
शुक्रवारी (दि. ९) चांडक परिसरातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या संचालकांची अनौपचारिक बैठक झाली. या बैठकीत विद्यमान अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही ठरल्यानुसार राजीनामा न दिल्याने काही संचालकांनी नाराजीचा सूर व्यक्त केला होता. त्यातच सर्व संचालकांचे मत असल्याने सर्व संमतीने विद्यमान अध्यक्षांनी राजीनामा द्यावा, असा सूर या बैठकीत व्यक्त करण्यात आला होता. प्रत्यक्षात आपल्याला ज्या संचालकांनी अध्यक्ष केले, त्यांनी सांगितले तरच आपण राजीनामा देऊ, अन्य संचालकांनी आपला राजीनामा मागण्याचे कारण काय? असा रोखठोक प्रश्न अध्यक्षांनी नंतर काही संचालकांशी बोलताना व्यक्त केल्याचे समजते. अध्यक्षांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्यासाठी एक तृतीयांश संचालकांचे संख्याबळ अर्थात १५ संचालक राजी होणे आवश्यक आहे. शुक्रवारी झालेल्या बैठकीत २१ पैकी जवळपास १७ संचालक बैठकीस उपस्थित होते. येत्या २० सप्टेंबरपर्यंत अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा घेण्याच्या मतापर्यंत सर्व संचालकांचे एकमत झाले आहे. सर्वसाधारण सभेनंतर अध्यक्षपदाचा फैसला होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)