जिल्हा बॅँक निवडणूक : पुढील आठवड्यात निवडणूक कार्यक्रम शक्य
By admin | Published: April 17, 2015 12:40 AM2015-04-17T00:40:09+5:302015-04-17T00:41:00+5:30
समान जागा मिळाल्या तरच एकत्रीकरण?
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा ज्वर वाढू लागला असून, ढिकले-हिरे पॅनलच्या एकत्रीकरणाच्या हालचाली सुरू होताच दोेन्ही गटांमध्ये मान-सन्मान देण्या-घेण्यावरून आता चर्चा सुरू झाल्याचे समजते. ब गटासाठी असलेल्या सहा जागांपैकी निम्म्या निम्म्या जागा दोन्ही गटांना मिळाल्या पाहिजे, असा चर्चेचा सूर व्यक्त होत असल्याचे वृत्त आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची अंतिम पारूप मतदार यादी मागील आठवड्यात प्रसिद्ध झाल्यानंतर दहा दिवसांच्या आत निवडणुकीचा कार्यक्रम घेण्याची सहकार कायद्यातच तरतूद असल्याचे काही माजी संचालकांचे म्हणणे असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा पुढील आठवड्यात मंगळवारी किंवा बुधवारी (दि. २२) होण्याची शक्यता आहे.
स्व. उत्तमराव ढिकले यांच्या पॅनलचे नेतृत्व आता त्यांचे चिरंजीव डॉ. सुनील ढिकले यांच्याबरोबरच माजी संचालक शिरीषकुमार कोतवाल, गणपतराव पाटील आदि करण्याची शक्यता असून, या पॅनलला अॅड. संदीप गुळवे, धनंजय पवार यांचे समर्थन मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीसाठी ढिकले यांच्या पॅनलबरोबरच तिकडे अॅड. माणिकराव कोकाटे व देवीदास पिंगळे यांचे दुसरे पॅनल, तर अद्वय व आमदार अपूर्व हिरे बंधूंचे तिसरे पॅनल तयार होण्याची शक्यता होती; मात्र उत्तमराव ढिकले यांच्या निधनानंतर अचानक सर्व समीकरणे बदलून आता हिरे पॅनलने ढिकले पॅनलसोबत एकत्र येण्याच्या हालचाली सुरू केल्या असून, त्यासाठी चर्चेच्या फेऱ्याही सुरू असल्याचे समजते.