कर्जमर्यादा एक लाख करण्याचा निर्णय जिल्हा बॅँक बैठक
By admin | Published: June 14, 2015 01:52 AM2015-06-14T01:52:02+5:302015-06-14T01:52:03+5:30
हिरे बंधूंसह कोकाटे अनुपस्थित
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेमार्फत शेतकऱ्यांना दिले जाणारे कर्ज ८५ हजारांवरून एक लाख रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय काल (दि.१३) झालेल्या जिल्हा बॅँक संचालकांच्या पहिल्याच बैठकीत घेण्यात आला. संचालक मंडळ निवडून आल्यानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीस दोन्ही हिरे बंधू संचालक, तसेच माजी आमदार माणिकराव कोकाटे बैठकीस अनुपस्थित होते. अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या उपस्थितीत ही बैठक बोलविण्यात आली होती. बैठकीस उपाध्यक्ष सुहास कांदे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार सीमा हिरे, आमदार अनिल कदम, आमदार जे.पी. गावित, माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल, दिलीप बनकर, किशोर दराडे, शिवाजी चुंभळे, केदा अहेर, सचिन सावंत, नामदेव हलकंदर, परवेज कोकणी, धनंजय पवार, गणपतराव पाटील, अॅड. संदीप गुळवे, डॉ. शोभा बच्छाव, कार्यकारी संचालक सुभाष देसले आदि उपस्थित होते. बैठकीत नियमित १५ विषयांवर चर्चा होऊन पाच समित्यांवर संचालक नियुक्तीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्यात आले. त्यानुसार पाच विविध प्रकारच्या समित्या नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. बॅँकेतील आर्थिक कारभार पाहण्याचे व त्या अनुषंगाने स्वाक्षरीचे अधिकार अध्यक्ष नरेंद्र दराडे यांना देण्याच्या विषयाला बैठकीत मंजुरी देण्यात आली. बॅँकेत १९०० कर्मचाऱ्यांची आवश्यकता असताना प्रत्यक्षात १२३० कर्मचारीच कार्यरत असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण पडत असल्याचे शिरीषकुमार कोतवाल यांनी सांगितले. जर १२३० कर्मचाऱ्यांचीच मर्यादा होते, तर मग सेवानिवृत्त झालेले १०० कर्मचारी पुन्हा वेतनावर सेवेत कशाला घेतले? अशी विचारणाही कोतवाल यांनी केली. शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणाऱ्या कर्जाची मर्यादा ८५ हजारांवरून १ लाख रुपये करण्याचा एकमुखी ठराव संमत करण्यात आला. कर्जमर्यादा वाढविण्यात आलेली असली तरी प्रत्यक्षात कर्ज वाटपच अडचणीत आल्याची चर्चा काही संचालकांमध्ये होती.(प्रतिनिधी)