ट्रॅक्टर लिलावातून जिल्हा बँकेची ५५ लाखाची वसुली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2022 01:46 AM2022-02-09T01:46:14+5:302022-02-09T01:46:59+5:30
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धडक थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत सटाणा येथे जप्त केलेल्या २१ ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात येऊन त्यापोटी बँकेने ५५ लाख, ८२ हजार रुपये वसूल केले आहेत. जिल्हा बँकेने यापूर्वी खातेदारांना वाहनकर्ज वाटप केले; परंतु त्याचा भरणा केला नसल्याने अशी थकबाकीदार वाहने जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धडक थकबाकी वसुली मोहिमेंतर्गत सटाणा येथे जप्त केलेल्या २१ ट्रॅक्टरचा जाहीर लिलाव करण्यात येऊन त्यापोटी बँकेने ५५ लाख, ८२ हजार रुपये वसूल केले आहेत. जिल्हा बँकेने यापूर्वी खातेदारांना वाहनकर्ज वाटप केले; परंतु त्याचा भरणा केला नसल्याने अशी थकबाकीदार वाहने जप्त करण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे. बँकेने आत्तापर्यंत जिल्ह्यातील एकूण २३८ वाहने, ट्रॅक्टर जप्त केलेले आहेत. त्यानुसार मंगळवारी सटाणा तालुक्यातील जप्त केलेल्या २३ ट्रॅक्टरचा इंजमाने, नामपूर येथे जाहीर लिलाव ठेवला होता. त्यात एका थकबाकीदाराने पैसे भरल्याने त्याचा ट्रॅक्टर सोडून देण्यात आला; तर उर्वरित २२ ट्रॅक्टरची लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात २१ ट्रॅक्टरचा लिलाव झाला असून, बँकेस ५५ लाख ८२ हजार रुपये मिळाले आहेत.
सदर सभासद हे सन २००१ ते २०१२ ह्या कालावधीतील थकबाकीदार आहेत. बँकेने वारंवार कर्जमागणी नोटिसा देऊनही व सौजन्याने तगादे करूनही त्यांनी थकीत कर्ज रकमेचा बँकेकडे भरणा केला नसल्यामुळे सदरची कारवाई करण्यात आली. या लिलावाप्रसंगी बँकेचे सरव्यवस्थापक नितीन ओस्तवाल, वसुली अधिकरी प्रदीप (रमेश) शेवाळे, विभागीय अधिकारी सूर्यवंशी, राजेंद्र भामरे, हेमंत भामरे, रवींद्र पगार, नीलेश भामरे, तुषार अहिरे, आदी उपस्थित होते.