जिल्हा बॅँकेला मिळणार निधी
By Admin | Published: April 20, 2017 12:25 AM2017-04-20T00:25:52+5:302017-04-20T00:26:08+5:30
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येण्याची चिन्हे आहे.
नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येण्याची चिन्हे असून, बुधवारी (दि. १९) मुंबईत जिल्"ाचे पालकमंत्री गिरीश महाजन यांची बॅँकेच्या संचालक मंडळाने भेट घेऊन राज्य शिखर बॅँकेच्या निधीबाबत चर्चा केली. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्हा बॅँकेला राज्य शिखर बॅँकेकडून निधी उपलब्ध करून देण्यास शासन निर्देशित करेल, असे आश्वासन यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन यांनी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते.
दरम्यान, राज्य शिखर बॅँकेची गुरुवारी (दि. २०) मुंबईत याच कारणाने तातडीची बैठक आयोेजित करण्यात आल्याची माहिती जिल्हा बॅँकेचे संचालक तथा प्रवक्ते परवेज कोकणी यांनी दिली.
बुधवारी (दि. १९) जिल्हा बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्यासह बॅँकेचे संचालक शिरीषकुमार कोतवाल, परवेज कोकणी, अॅड. माणिकराव कोकाटे, गणपतराव पाटील, आमदार सीमा हिरे यांच्यासह संचालकांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन जिल्हा बॅँकेच्या आर्थिक परिस्थितीबाबत कल्पना दिल्याचे कळते. नोटाबंदीनंतरच्या काळात जमा झालेल्या नोटा स्वीकारण्यास रिझर्व्ह बॅँकेने नकार दिल्यानंतर राज्य शिखर बॅँकेकडे जिल्हा बॅँकेच्या ठेवींच्या स्वरूपात असलेल्या ५४० कोटींपैकी २३० कोटी अद्याप बाकी असून, ही रक्कम रोख तरलता म्हणून स्वीकारण्यास मान्यता मिळाली नसल्याने जिल्हा बॅँकेने यातील किमान १०० कोटींचा निधी तत्काळ मिळावा यासाठी ठराव संमत केला असून, तसा प्रस्ताव राज्य शिखर बॅँकेकडे पाठविल्याचे शिष्टमंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे समजते. त्यामुळे राज्य शिखर बॅँकेला शासन जिल्हा बॅँकेला निधी उपलब्ध करून देण्याबाबत तत्काळ आदेश देईल, अशी ग्वाही गिरीश महाजन यांनी यावेळी शिष्टमंडळाला दिल्याचे समजते. त्यामुळे जिल्हा बॅँकेची आर्थिक परिस्थिती येत्या दोन-तीन दिवसांत पूर्व पदावर येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)