एप्रिलपासून खरीप पिक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेचा निर्णय : कर्जफेड करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 01:38 AM2021-03-27T01:38:28+5:302021-03-27T01:38:41+5:30

नाशिक : जिल्हा बँकेचे कर्जदार असले तरी, नातेवाईकांच्या ठेवीतून ते कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात यावे, त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांच्या दोन लाखांची शासनाने हमी घ्यावी आदी मागण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. कर्जदारांनी रोख स्वरूपात कर्ज भरणा केल्यास येत्या १ एप्रिलपासून खरीपाचे कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले.

District Bank's decision to disburse kharif crop loan from April: Appeal to repay the loan | एप्रिलपासून खरीप पिक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेचा निर्णय : कर्जफेड करण्याचे आवाहन

एप्रिलपासून खरीप पिक कर्जाचे वाटप जिल्हा बँकेचा निर्णय : कर्जफेड करण्याचे आवाहन

googlenewsNext

नाशिक : जिल्हा बँकेचे कर्जदार असले तरी, नातेवाईकांच्या ठेवीतून ते कर्जखात्यात वर्ग करून घेण्यात यावे, त्याच बरोबर दोन लाखापेक्षा अधिक कर्ज असलेल्या कर्जदारांच्या दोन लाखांची शासनाने हमी घ्यावी आदी मागण्यात शुक्रवारी झालेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आली. कर्जदारांनी रोख स्वरूपात कर्ज भरणा केल्यास येत्या १ एप्रिलपासून खरीपाचे कर्ज वाटप सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन प्रशासकांनी दिले. जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त झाल्यानंतर दोनच दिवसांनी बँकेची वार्षिक सभा होत असल्याने त्याकडे साऱ्यांचे लक्ष लागून होते. ऑनलाईन सभा असल्यामुळे खातेदारांना या सभेसाठी सहभागी होण्यासाठी अगोदरपासूनच नोंदणी अनिवार्य करण्यात आली होती. त्यानुसार दुपारी एक वाजता सभेच्या कामकाजाला सुरूवात झाली. परंतु बहुतांशी सभासदांनी तांत्रिक कारणाने सहभागी होता येत नसल्याच्या तक्रारी केल्या. या सभेस प्रशासक चंद्रकांत बारी यांनी, बँकेची आर्थिक परिस्थिती विषद करून सुमारे दोन हजार कोटी रूपयांची थकबाकी असून, कर्जदारांनी नियमित कर्जफेड केल्यास बँकेचे वैभव प्राप्त होण्यास वेळ लागणार नसल्याचे सांगितले. यावर सभासदांनीही आपले मते मांडली. जे बँकेचे कर्जदार आहेत, परंतु त्यांच्या कुटुंबीयांतील अन्य व्यक्तींच्या बँकेत ठेवी आहेत त्यांच्या संमतीने त्याचे पैसे कर्जात भरून घेण्यात यावे, जेणेकरून बँकेचे पैसे बँकेतच राहतील अशी सुचना केली. त्यावर मात्र प्रशासकांनी असहमती दर्शविली. कर्जदारांनी रोख स्वरूपातच कर्जभरणा करावा असे त्यांनी आवाहन केले. याच बरोबर कर्जदार शेतकऱ्यांनी गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शेती अर्थव्यवस्था डबघाईस आली असून, अवकाळी पावसाने पुन्हा नुकसान झाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन करून द्यावे तसेच कर्ज भरणासाठी हप्ते बांधून देण्याची मागणी केली. शासनाच्या समझोता योजनेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कर्जदार शेतकऱ्यांच्या दोन लाखाची शासनाने हमी घ्यावी उर्वरित कर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना हप्ते बांधून देण्यात यावी असा ठरावही यावेळी करण्यात आला.

सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीस प्रशासक मंडळ प्रमुख आरिफ खान यांनी, कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेवर कर्ज भरणा केल्यास गरजवंत शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करणे शक्य होणार असल्याचे सांगितले. यंदाही खरीप हंगाम तोंडावर असून, शेतकऱ्यांना खरीपाचे कर्जवाटप येत्या १ एप्रिलपासून करण्यात येणार आहे. त्यात नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल असे सांगितले. तसेच मोठ्या कर्जदारांनी कर्जफेड करून कटू प्रसंग टाळावा असे आवाहनही केले. यावेळी बँकेचे माजी अध्यक्ष केदा आहेर, गणपत पाटील, परवेज कोकणी, शिवाजी चुंभळे आदी सहभागी झाले होते.

Web Title: District Bank's decision to disburse kharif crop loan from April: Appeal to repay the loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.