जिल्हा बालसंरक्षण कक्षाला दोन महिन्यांपासून कुलूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2019 01:46 AM2019-11-20T01:46:44+5:302019-11-20T01:47:09+5:30
बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष सक्षम झाल्याशिवाय बालहक्काचे संरक्षण होणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
नाशिक : बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्याबरोबरच बालकांच्या संदर्भातील योजना राबविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा बालसंरक्षण कक्षाला गेल्या दोन महिन्यांपासून कुलूप लागले आहे. बालहक्कासाठी कितीही सकारात्मक योजना करण्यात आल्या असल्या तरी बालसंरक्षण कक्ष सक्षम झाल्याशिवाय बालहक्काचे संरक्षण होणार कसे? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.
बालकांचे हक्क अबाधीत राखण्याबरोबरच बालकांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांच्या जगण्याचा अधिकार अधिक प्रबळ करण्यासाठी एकात्मिक बालसंरक्षण योजनेंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात बालसंरक्षण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. शून्य सहा आणि सात ते अठरा वर्षांपर्यंतच्या वंचित आणि निराधार बालकांना जगण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी बालसंरक्षण कक्षाची भूमिका महत्त्वाची मानली जाते. महिला व बाल कल्याण समितीच्या आदेशाचे पालन करण्याबरोबरच संबंधित बालकांचे योग्य संगोपन होत आहे किंवा नाही याची अत्यंत महत्त्वपूर्ण जबाबदारी बाल कक्षाच्या वतीने पार पाडली जाते. त्यामुळे हा कक्ष अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
परंतु नाशिकमधील बालसंरक्षण कक्ष गेल्या महिनाभरापासून बंद असल्यामुळे बालसंरक्षण कामकाजा जवळपास ठप्प झाले आहे. बालकांच्या संदर्भात काम करणाºया जिल्ह्यातील ३८ संस्थांवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि बालकांच्या हक्काचे संरक्षण करणारी एक व्यवस्था असतानाही सदर व्यवस्थेकडे नेहमीच दुर्लक्ष झाल्याचे दिसून येते. कधी वेतन, तर कधी कर्मचारी संख्येच्या कारणावरून सदर कक्ष चर्चेत आला आहे. दरम्यान, या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेतली असता मुदत संपल्यामुळे महिनाभरापासून कक्ष बंद असून, येथील कर्मचारी अन्य संस्थांकडे वर्ग करण्यात आल्याचे समजते. निरीक्षणगृहांवर नियंत्रण ठेवणे, त्यांच्या कामाचा दर्जा तपासणे, सरकारी निधी नियोजित वेळेत प्राप्त होती किंवा नाही, मुलांच्या हितासंदर्भात योजनांची अंमलबजावणी होते की नाही हे पाहणे आदी कामे जिल्हा बालसंरक्षण कक्षाकडे देण्यात आली आहेत. बालसंगोपनासह मुलांना आर्थिक मदत पुरविण्याचे कामदेखील या कक्षाकडून केले जाते. बालमजुरी, मुलांवरील लैंगिक अत्याचार, बालविवाह थांबविण्यासाठी प्रयत्न आदी प्रश्नांवरदेखील कामकाज केले जाते.
बालकायदा २००० नुसार बालसंरक्षण समितीमुळे बालमजुरी आणि बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी अधिकृतरीत्या कार्यवाही आणि भूमिका घेण्याचा अधिकार बालसंरक्षण कक्षाला आहे.