दिवाळी सणाच्या कालावधीत कार्यालयीन स्वच्छता करून जिल्हा परिषक कर्मचाऱ्यांनी पालटले रेकॉर्ड रुपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 08:26 PM2017-10-25T20:26:05+5:302017-10-25T20:29:40+5:30
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे
नाशिक : जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या आवाहनाला सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्र्रतिसाद देत कार्यालयीन स्वच्छतेवर भर दिला असून, यापूर्वी अस्ताव्यस्त पडलेल्या गाठोड्यांच्या रेकॉर्डरूमचे रुपडे पूर्णपणे पालटले आहे.
जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागाच्या कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनीही दिवाळी सणाच्या कालावधीत सुट्या न घेता शनिवार व रविवारीही काम करीत अभिलेख वर्गीकरण व व्यवस्थापनाचे काम पूर्ण केल्याने हा बदल दिसून येत आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये गेल्या ३० ते ४० वर्षांपासूनच्या कपाटांच्यावर गाठोडे बांधून ठेवलेल्या फाइल्स पुनर्जीवित झाल्या असून, सर्वच विभागांतील कर्मचाऱ्यांनी घरातील स्वच्छतेप्रमाणेच कार्यालयातील अभिलेख व इतर साहित्य नीटनेटके ठेवण्यास प्रारंभ केला आहे. त्यानिमित्ताने वेगवेगळ्या विभागांमध्ये आतापर्यंत धूळ खात पडलेल्या फाइलींची धूळ झटकली जात असून, त्यांना सुस्थितीत ठेवण्यासोबतच नंबरिंगही करण्यात येत आहे. सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी फाइलींचे वर्गीकरण करण्यासंदर्भात कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करीत असून, प्रत्येक विभागाचे विभागप्रमुखही फाइल मॅनेजमेंटकडे कटाक्षाने लक्ष देत असल्याने जिल्हा परिषदेच्या रेकॉर्डरूमचा कायापालट झाल्याचे दिसून येत आहे.