आमदारांच्या नाराजीनाट्यानंतर जिल्हाधिकारी नांदगावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:18 AM2021-09-14T04:18:15+5:302021-09-14T04:18:15+5:30
नांदगाव : ‘अतिवृष्टी व पुराने झालेले नुकसान’ या विषयावर गेल्या शनिवारी (दि.११) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून ...
नांदगाव : ‘अतिवृष्टी व पुराने झालेले नुकसान’ या विषयावर गेल्या शनिवारी (दि.११) तहसील कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी यांच्या अनुपस्थितीवरून पालकमंत्री छगन भुजबळ व आमदार सुहास कांदे यांच्यात झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी नांदगाव शहराला सोमवारी (दि.१३) धावती भेट देऊन उपाययोजना करण्यासंदर्भात तालुका स्तरावरील अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी समवेत आमदार सुहास कांदे होते. यानंतर लगेच ते साकोरे येथे भेट देण्यासाठी गेले.
लेंडी नदी पुलावरील भेटीत जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थिती समजावून घेतली. जिल्हा नियोजन मंडळ व नगर विकास खाते यातून निधीची तरतूद करण्यासाठी आराखडा तयार करण्यासंदर्भात त्यांनी मुख्याधिकारी विकास धांडे यांच्याशी यावेळी केलेल्या चर्चेत लेंडी नदीवरील पुलाची उंची वाढवावी. तसेच वॉक वे तयार करावा. जेणेकरून भविष्यात अतिक्रमण होणार नाही. सावता माळी कंपाउंड तसेच समता मार्ग यावर चार-पाच कायमस्वरूपी कामे करण्यात येतील, असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले.
प्राथमिक पातळीवर यापूर्वी मदत केलेली आहे. आपत्तीची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून कायमस्वरूपी योजनांसाठी अग्रक्रम देऊन त्या योजनांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवायचा आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन मंडळातून काही रक्कम मंजूर करून घेण्यासाठी ‘समर्थनीय’ प्रस्ताव पाठवण्याची तयारी सुरू आहे. दोन-तीन ठिकाणी पाण्याची पाइपलाइन खराब झाली आहे. स्मशानभूमी व कचरा डेपोकडे जाणारा रस्ता खराब झाला आहे. या सर्वांसाठी शासनाकडून निधी मिळविण्यासाठी प्रशासन काम करत आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मांढरे यांनी दिली.
पीक पाहणीचे अहवालाविषयी सावध प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, पालकमंत्री व आमदार महोदय यांच्या सूचना आहेत. मात्र पीक पाहणी अहवालाची दोन-तीन स्तरांवरून पडताळणी होत असते. एकूण अहवालातील ५ टक्के पडताळणी प्रांत, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त करत असतात. प्रशासन कायमस्वरूपी उपाययोजनांवर भर देऊन त्याची अंमलबजावणी लवकर करण्याच्या पद्धतीवर भर देत आहे. रेल्वेने बनवलेल्या अंडर पासमधील पाण्याची समस्या अनेक ठिकाणी असून, त्याविषयी रेल्वे अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करावी लागेल. स्वयंचलित हापशी किंवा वेगळ चॅनलिंग करता येइल का याबाबत चर्चेतून तोडगा काढता येईल, असेही त्यांनी सांगितले.
इन्फो
फेरीवाल्यांसाठी लेआउट करा
आपत्तीतून चांगल्या गोष्टी करता येतात. नगरविकास विभागाचे फेरीवाल्यांसाठी धोरण आहे. त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न असतो. फेरीवाल्यांसाठी एखाद चांगले ठिकाण ठरवून दिले, चांगला लेआउट करून दिला, तर त्यांचे व्यवसाय नियमित होतील. त्यांना कर्ज देण्याच्या योजना आहेत. यावर आपण प्रयोग सुरू करा अशा सूचना मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत. सगळ्यांच्या सहकार्याची अपेक्षा मांढरे यांनी व्यक्त केली.
फोटो - १३ नांदगाव कलेक्टर
नांदगाव येथे पाहणीप्रसंगी जिल्हाधिकारी सुरज मांढरे व आमदार सुहास कांदे.
130921\13nsk_39_13092021_13.jpg
फोटो - १३ नांदगाव कलेक्टर