जिल्हाधिकारी : बागलाण, मालेगाव तालुक्यात उपाययोजना राबविण्याचे आदेश साठ गावे पाणीटंचाईग्रस्त घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2017 11:27 PM2017-12-16T23:27:40+5:302017-12-17T00:21:44+5:30
भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत.
सटाणा : भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा यांच्या अहवालानुसार जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी बागलाण व मालेगाव तालुक्यातील तब्बल साठ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित केली आहेत. या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्यासाठी उपाययोजना राबविण्याचे आदेश जिल्हाधिकाºयांनी दिले आहेत.
शासनाच्या टंचाई कृती आराखड्यानुसार आॅक्टोबर ते डिसेंबर, जानेवारी ते मार्च व एप्रिल ते जून अशा तीन टप्प्यात टंचाई निवारणासाठी उपाययोजना
करण्यात येतात. जिल्हाधिकाºयांनी पाणीटंचाई निवारणासाठी भूवैज्ञानिक व भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेला सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले होते.
नुकत्याच झालेल्या टंचाई आढावा बैठकीत सादर केलेल्या सर्वेक्षण अहवालात, बागलाण व मालेगाव तालुक्यात आॅक्टोबर ते मार्च अखेरपर्यंत भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून राहणार आहे. त्यामुळे हे सहा महिने पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही. मात्र त्यानंतर पाण्याच्या पातळीत घट होऊन एप्रिल ते जून हे तीन महिने साठ गावांना पाण्याची टंचाई निर्माण होणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाºयांनी साठे गावे टंचाईग्रस्त घोषित करून, संबंधित गावांना खबरदारीच्या सूचना करून पिण्याच्या पाण्याचे स्रोत संरक्षित करण्याचे आदेश दिले आहेत. हे ३१ जुलै २०१८ पर्यंत लागू राहणार आहेत.
या गावांमध्ये पाणीटंचाई
घोषित केलेल्या गावांमध्ये बागलाण तालुक्यातील चिराई, महड, सारदे, वायगाव, रातीर, देवळाणे, सुराणे, राजपूरपांडे, श्रीपूरवडे, टिंगरी, उत्राणे, वडे खुर्द, वाघळे, ब्राह्मणपाडे, जायखेडा, जाखोड, करंजाड, लाडूद, निताणे, सोमपूर, आसखेडा, द्याने, फोपीर, खिरमाणी, कोटबेल, नामपूर, अजमीर सौंदाणे, कºहे, जुनी शेमळी, लखमापूर, यशवंतनगर, अंतापूर, दगडपाडा, जामोटी, मोराणे दिगर, मुल्हेर, रावेर, ताहाराबाद, वडे दिगर, अलियाबाद, बाभुळणे, बोरदैवत, कांद्याचा मळा, खरड, परशुरामनगर, वाघंबे तसेच मालेगाव तालुक्यातील कजवाडे, पोहाणे, विराणे, भायगाव, अजंग, कोठरे बुद्रूक, सातमाणे, वडनेर, पांढरून या गावांचा समावेश आहे.