एकलव्य संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी
By admin | Published: February 24, 2016 11:23 PM2016-02-24T23:23:44+5:302016-02-24T23:24:39+5:30
बोगस आदिवासी शोधणाऱ्या अधिकाऱ्याला संरक्षण पुरवा
नाशिक : नांदेड जिल्ह्णातील महादेव कोळी प्रवर्गातील बोगस आदिवासी प्रमाणपत्र असल्याचे शोधून संबंधितावर कारवाई करणारे डॉ. राजेंद्र भारूड यांना स्थानिक स्तरावरून त्रास देण्यात येत असून त्यांना संरक्षण पुरवा व अशा अधिकाऱ्याच्या पाठीशी प्रशासनाने उभे राहावे, या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य एकलव्य संघटनेच्या वतीने बुधवारी (दि. २४) जिल्हाधिकाऱ्यांना दिले.
नांदेड येथे कोळी महादेव मन्नेवारलु या समाजाच्या नावे बोगस आदिवासी असल्याचे प्रमाणपत्र डॉ. राजेंद्र भारूड यांच्या तपासणीत आढळून आले होते. त्यांनी त्याप्रकरणी योग्य ती कारवाई केली. त्यांनी बोगस आदिवासी शोधून खऱ्या आदिवासींना न्याय दिला आहे. त्यांच्यासारख्या प्रामाणिक अधिकाऱ्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचे काम बोगस
आदिवासी करीत आहेत. त्यांचा संघटना निषेध करते. त्यामुळे प्रशासनाने यासंदर्भात डॉ. राजेंद्र भारूड यांच्या पाठीशी राहून त्यांना त्रास देणाऱ्यांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी एकलव्य संघटनेचे राज्य संघटक व जिल्हा परिषद सदस्य प्रा. प्रवीण गायकवाड, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नितीन मोरे, जिल्हा अध्यक्ष अजित पवार, उपाध्यक्ष वैभव सोनवणे, संतोष मढवई, ज्ञानेश्वर मढवई, संतोष निकम, संजय पवार, विजय बर्डे, मोठाभाऊ दळवी, राजेंद्र पिंपळे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)