न्यायदान : जिल्हा न्यायालयाचे कामकाज दोन सत्रांत सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 06:14 PM2020-06-08T18:14:03+5:302020-06-08T18:18:08+5:30
सकाळी १० ते १ दुपारी २:३० ते पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या वकिलांसह प्रकरणे दाखल करण्यासाठी येणा-या नागरिकांची थर्मल स्कॅनकरूनच प्रवेश दिला जात होता. तसेच शिपायांकडून सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिले जात होते.
नाशिक : लॉकडाऊननंतर राज्यात ‘मिशन बिगेन अगेन’अंतर्गत शासनाने दैनंदिन व्यवहार हळुहळु पुर्वपदावर आणण्यास सुरूवात केली आहे. यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयदेखील पुर्ववत करण्यात आले आहे. सोमवारी (दि.८) सकाळी व दुपारी अशा दोन सत्रांत न्यायालयाचे कामकाज चालले. कोरोना आजाराचे संक्रमण टाळण्यासाठी न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासून तर थेट कोर्ट रूमपर्यंत विशेष खबरदारी घेण्यात आली होती.
नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात सोमवारपासून दुपारचे सत्रदेखील सुरू करण्यात आले. एकूण चार जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या कोर्टासह सिव्हील खटल्यांकरिता दोन आणि प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांचे दोन असे एकूण आठ न्यायालयांमध्ये न्यायदानाचे कामकाज पार पडले. मंगळवारी (दि.९) यामध्ये दोन सत्र न्यायाधीशांचे कोर्ट अधिक सुरू करण्यात येतील. यामध्ये नियमित जामीन व अटकपुर्व जामिन अर्जांवर सुनावणी होईल. एकूण दहा न्यायालये मंगळवारपासून सुरू होतील, अशी माहिती न्यायालयीन सुत्रांकडून देण्यात आली आहे. सध्या नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयासह नाशिकरोड व मालेगाव न्यायालयात केवळ अती तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेतली जात आहेत. या सुनावणीदरम्यान केवळ कोर्टरूमध्ये न्यायाधीशांसमोर दोन्ही पक्षांचे दोन वकील आणि महत्त्वाचे साक्षीदार यांची उपस्थितीला प्राधान्य देण्यात येत आहे. प्रत्यक्षपणे पक्षकाराची उपस्थिती तुर्तास या कोरोनाच्या संक्रमणामुळे अनिवार्य नसल्याची सुचनाच उच्च न्यायालयाकडून देण्यात आली असून त्याचे पालन केले जात आहे. उर्वरित तालुका न्यायालयांमध्ये मात्र ५० ते ६० टक्के अधिकारी-कर्मचारीवर्गाच्या उपस्थितीत सर्वच प्रकारच्या खटल्यांचे नियमितपणे न्यायदानाचे कार्य सुरू झाले आहेत; मात्र कोरोना संक्रमणाबाबत घ्यावयाची खबरदारी पुर्णपणे घेण्याच्या सुचना प्रत्येक तालुकास्तरावरील न्यायालयांना जिल्ह्याचे प्रधान मुख्य सत्र न्यायाधीशांकडून देण्यात आल्या आहेत.
सोमवारी दिवसभरात दोन्ही सत्रांमध्ये नाशिक जिल्हा न्यायालय व मालेगावमध्ये फौजदारी आणि अतितातडीच्या प्रकरणांची सुनावणी घेण्यात आली. सकाळी १० ते १ दुपारी २:३० ते पाच वाजेपर्यंत न्यायालयाचे कामकाज चालले. न्यायालयाच्या प्रवेशद्वारापासूनच येणाऱ्या वकिलांसह प्रकरणे दाखल करण्यासाठी येणा-या नागरिकांची थर्मल स्कॅनकरूनच प्रवेश दिला जात होता. तसेच शिपायांकडून सॅनिटायझरदेखील उपलब्ध करून दिले जात होते. वकिल चेंबर, बार रूम हे सुरू करण्याची अजूनही परवानगी देण्यात आलेली नाही.