जिल्ह्यासाठी दोन हजार क्विंटल तूरडाळ दाखल
By Admin | Published: August 20, 2016 01:40 AM2016-08-20T01:40:23+5:302016-08-20T01:42:10+5:30
१०३ रुपये किलो : काळाबाजार रोखण्याचे आव्हान
नाशिक : खुल्या बाजारात दोनशे रुपयांपर्यंत भाव पोहोचल्याने सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलेली तूरडाळ रेशनमधून स्वस्त दरात उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यातील शिधापत्रिका धारकांसाठी पहिल्या टप्प्यात दोन हजार क्विंटल तूरडाळ दाखल झाली असून, येत्या आठवडाभरात रेशन दुकानांच्या माध्यमातून तिचे वाटप होणार आहे. (पान १० वर)
सध्या सणासुदीचे दिवस असल्याने त्या पार्श्वभूमीवर खुल्या बाजारात तूरडाळ पुन्हा दोनशे रुपयांपर्यंत पोहोचल्याने गोरगरिबांनी वरण-भात खावा की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. विद्यमान राज्यकर्त्यांना नजीकच्या काळात तूरडाळ अडचणीत आणण्याची चिन्हे दिसत असतानाच शासनाने पात्र शिधापत्रिकाधारकांना रेशनवर स्वस्त दरात तूरडाळ देण्याचा निर्णय जुलै महिन्यात घेतला. साखरेप्रमाणेच खुल्या बाजारातील व्यापाऱ्यांकडून तूरडाळ खरेदी करून त्यांनीच थेट शासकीय धान्य गुदामापर्यंत ती पोहोचविण्यासाठी ठेके मागविण्यात आल्यानंतर नाशिक जिल्ह्यासाठी कर्नाटक राज्यातील गुलबर्गा येथील व्यापाऱ्याने १०३ रुपये दराने तूरडाळ पुरविण्याचे मान्य केले. नाशिक जिल्ह्यातील अन्नपूर्णा, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबे व अन्न सुरक्षा योजनेत पात्र ठरलेल्या शिधापत्रिकाधारकांची संख्या चार लाख, ८० हजारांच्या आसपास असून, त्यातील प्रत्येक शिधापत्रिकाधारकाला एक किलोप्रमाणे डाळ वितरीत करण्यात येणार आहे. त्यानुसार दोन दिवसांपूर्वी जवळपास निम्मी म्हणजेच दोन हजार क्विंटल तूरडाळ जिल्ह्णात दाखल झाली आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त डाळ अगोदर नाशिक व मालेगाव धान्य वितरण कार्यालय क्षेत्र, नाशिक तालुका या भागात वितरीत केली जाणार असून, पुढच्या आठवड्यात प्राप्त होणारी डाळ उर्वरित जिल्ह्यासाठी देण्यात येईल.