जिल्ह्याला ३० हजार अतिरिक्त घरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2018 02:10 AM2018-10-06T02:10:40+5:302018-10-06T02:10:59+5:30
पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नाशिक : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात चांगले काम झाल्याबद्दल समाधान व्यक्त करून जिल्ह्याच्या सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणातून सुटलेल्या बेघरांसाठी अतिरिक्त ३० हजार घरे नव्याने देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
नाशिक जिल्ह्याच्या विकासकामांचा आढावा बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही माहिती दिली. ते पुढे म्हणाले, जिल्ह्याच्या ग्रामीण भागात २३ हजार घरे बांधून पूर्ण झाली असून, ७० हजार घरे बांधायची आहेत, तर त्यातील काही पूर्णत्वाकडे आहेत. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे कोणीही बेघर राहू नये म्हणून सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार जिल्ह्यासाठी ३० हजार घरांचा नव्याने कोटा वाढवून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चालू वर्षाअखेरीस गामीण भागात प्रत्येकाला घर मिळालेले असेल
असे सांगून, राज्य सरकारने सामाजिक, आर्थिक सर्वेक्षणानुसार ‘ड’ यादी तयार केली आहे. त्यात ज्यांची पंतप्रधान आवास योजनेत नावे नाहीत त्यांचा त्यात समावेश करण्यात आला आहे. ग्रामीण भागाप्रमाणेच शहरी भागातही या योजनेचा लाभ मिळावा यासाठी महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींना आवास योजनेसाठी टार्गेट देण्यात आले असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली.
जलयुक्त शिवार व मागेल त्याला शेततळे योजनेच्या आढाव्याची माहिती देताना मुख्यमंत्र्यांनी नाशिक जिल्ह्णात मागेल त्याला शेततळे योजनेत नऊ हजार कामे करण्यात आल्याचे सांगितले. तसेच गाळमुक्त धरण योजनेचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असून, त्यासाठी पालकमंत्र्यांनी साहित्य व जेसीबी पुरविण्याची जबाबदारी उचलली असल्याचे सांगितले.