जिल्ह्यात पुन्हा बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचे प्रमाण अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 01:35 AM2020-12-16T01:35:09+5:302020-12-16T01:36:09+5:30
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमीअधिक होत असली तरी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे हेाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (दि.१५) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील चार रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागली असली तरी अजूनतरी ती मर्यादित आहे.
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमीअधिक होत असली तरी बाधितांच्या संख्येपेक्षा बरे हेाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. मंगळवारी (दि.१५) दिवसभरात आठ जणांचा मृत्यू झाला असून, त्यातील चार रुग्ण शहरातील आहेत. जिल्ह्यात दिवाळीनंतर कोराेनाबाधितांची संख्या वाढू लागली असली तरी अजूनतरी ती मर्यादित आहे. मंगळवारी (दि.१५) एकूण २४० रुग्ण बरे झाले, तर दिवसभरात १८१ नवे बाधित आढळले. यात १२५ रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील असून, ग्रामीण भागातील ५२ रुग्ण आढळले आहेत. मालेगाव महापालिका आणि जिल्हाबाह्य प्रत्येकी दोन रुग्ण आढळले आहेत.
दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यात नाशिक शहरातील चार, तर ग्रामीण भागातील चार रुग्णांचा समावेश आहे. मार्च महिन्यापासून आत्तापर्यंत जिल्ह्यात १ हजार ८७५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील ९३८ रुग्णांचा समावेश आहे.
नाशिक जिल्ह्यात मार्चपासून आत्तापर्यंत १ लाख ५ हजार ७५३ रुग्ण आढळले आहेत, तर २ लाख ९८ हजार ४६३ रुग्ण निगेटिव्ह आले आहेत. नाशिक शहरात आत्तापर्यंत आढळलेल्या कोरोनाबाधितांची संख्या ६९ हजार ५१९ इतकी असून, त्यापैकी ६६ हजार ३०१ रुग्ण बरे झालेले आहेत. नाशिक शहरात सध्या २ हजार २८० रुग्ण उपचार घेत आहेत.