जिल्हा रुग्णालय कर्मचाऱ्याची आजारपणाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 01:33 AM2021-09-22T01:33:57+5:302021-09-22T01:34:44+5:30
जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी अशोक पुंडलिक दराडे यांनी सोमवारी (दि. २०) साडेपाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
नाशिक : जिल्हा शासकीय रुग्णालयातील कर्मचारी अशोक पुंडलिक दराडे यांनी सोमवारी (दि. २०) साडेपाच वाजेच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक दराडे (वय ५६, रा. संदर्भ सेवा रुग्णालय, स्टाफ कॉर्टर, शालीमार ) यांनी सोमवारी (दि. २०) सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातील बेडरूममधील छताच्या पंख्याला साडी बांधून गळफास घेतला. या घटनेची माहिती त्यांची पत्नी कौशल्या दराडे यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी भद्रकाली पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद केली आहे. दरम्यान, मृत अशोक दराडे हे मागील काही दिवसांपासून मधुमेहाच्या आजाराने त्रस्त होते. त्यासोबतच त्यांना आर्थिक समस्येचाही सामना करावा लागत होता. त्यामुळे त्यांनी आजारपणाला कंटाळून आणि आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस हवालदार चौधरी करीत आहेत.