जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़
By admin | Published: December 3, 2014 02:06 AM2014-12-03T02:06:50+5:302014-12-03T02:08:50+5:30
जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़
नाशिक : अंगावर गरमी पाणी पडल्याने भाजलेल्या एकाच कुटुंबातील दोघांचा उपचारादरम्यान हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप करीत रुग्णाच्या नातेवाइकांनी मंगळवारी रात्री जिल्हा रुग्णालयात प्रचंड गोंधळ घातला़ यावेळी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता़ याबाबत अधिक माहिती अशी की, भद्रकालीतील पिंजारघाट परिसरात निजाम सय्यद हे पत्नी शहनाझ, मुलगा रजा, मुलगी अलीझा यांच्यासह राहतात़ शुक्रवारी (दि़ २८) रात्री घरातील इलेक्ट्रिक हिटरचे पाणी अंगावर पडल्याने निजाम सय्यद (३५ टक्के), त्यांचा तीन वर्षांचा मुलगा रजा (४० टक्के) व मुलगी अलीझा (१० टक्के) भाजल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते़ उपचारादरम्यान रजाचा शनिवारी, तर निजाम सय्यद यांचा मंगळवारी मृत्यू झाला़ त्यांची मुलगी अलीझा गंभीर असून, पत्नीही गंभीर आहे़
या अपघातात निजाम सय्यद हे व्यवस्थित बोलत होते; मात्र त्यांच्यावर योग्य उपचार केले गेले नसल्याने त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप करून नातेवाइकांनी इमर्जन्सी वॉर्डातील सिस्टरांसोबत वाद घातला़ यावेळी पिंजारघाट परिसरातील जमलेले नागरिक व मृत व्यक्तींच्या नातेवाइकांनी डॉक्टरांना बोलावण्याची मागणी केली असता तेदेखील उपस्थित नव्हते व रुग्णालयातील दूरध्वनीही उचलून ठेवलेला होता़ याबाबत सिस्टरकडे विचारणा केली असता त्यांनी दिलेल्या उद्धट उत्तरांमुळे नातेवाइकांच्या संतापात आणखीनच भर पडली़
दरम्यान, या गोंधळाची माहिती मिळताच पोलीस उपआयुक्त अविनाश बारगळ, सहायक पोलीस आयुक्त रवींद्र वाडेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत सोमवंशी तातडीने घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली़ दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता़ (प्रतिनिधी)