जिल्हा रुग्णालय : उशिरा घेतला अंजलीचा मृतदेह ताब्यात
By admin | Published: October 29, 2015 10:31 PM2015-10-29T22:31:54+5:302015-10-29T22:32:12+5:30
विवाहितेच्या मृत्यू प्रकरणी पाच जणांना अटक
लासलगाव : येथील सुमननगर भागातील अवघ्या पाच महिन्यांपूर्वी विवाह झालेल्या अंजली सागर गायकवाड (२२) हिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून सासरकडील पाच जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मयत अंजली हिची आई लता भोलेनाथ शिंदे (रा. धुळे) यांनी लासलगाव पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. या फिर्यादीत म्हटले आहे की, विद्या ऊर्फ अंजली हिचा विवाह ६ जून २०१५ रोजी सागर उल्हास गायकवाड यांच्याशी झाला.
लग्नानंतर सासरकडील सागर उल्हास गायकवाड (पती), उल्हास काशीनाथ गायकवाड (सासरा), पुष्पा उल्हास गायकवाड (सासू), प्रांजल उल्हास गायकवाड व प्रियंका योगेश गरुड (नणंद) यांनी तिचा धंद्यासाठी माहेरहून दीड लाख रुपये आणावेत म्हणून शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. अखेर आई-वडिलांनी पन्नास हजार रुपये सासरी आणून दिले होते. बुधवारी रात्री नऊ वाजता नणंदेचा फोन आला व अंजली जिन्यावरून पडली असून, तिची तब्येत सिरियस आहे, असा निरोप मला आला. माहेरची मंडळी नाशिकला शासकीय रुग्णालयात आली असता
अंजली मयत झाली असे म्हटले
आहे.
खबऱ्यांच्या आधारे लासलगाव पोलीस कार्यालयात सागर गायकवाड, उल्हास गायकवाड, पुष्पा गायकवाड, प्रांजल गायकवाड व प्रियंका योगेश गरुड (सर्व रा. लासलगाव) यांच्याविरुद्ध दीड लाख रुपयांची मागणी करीत ती पूर्ण न केल्याने अंजलीला शारीरिक व मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अंजलीच्या सासरकडील सर्व पाच संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, अंजली सागर गायकवाड हिचा मृतदेह माहेरी धुळे येथे नेण्यात आला.
या प्रकरणी निफाडचे पोलीस उपनिरीक्षक दीपक गिर्हे यांच्या मार्गदर्शनाखाली लासलगावचे सहायक पोलीस निरीक्षक आर. बी. सानप व दीपक आवारे, हवालदार बी. आर. बिन्नर, एम. ए. शेख,
योगेश शिंदे, कैलास दरगुडे हे करीत आहेत. (वार्ताहर)