जिल्हा रुग्णालयाचा कक्षसेवक जाळ्यात
By admin | Published: April 17, 2015 11:30 PM2015-04-17T23:30:21+5:302015-04-17T23:43:37+5:30
लाचेची मागणी : न्यायालयीन कामासाठीच्या प्रमाणपत्राचे प्रकरण
नाशिक : न्यायालयीन कामासाठी आवश्यक असलेले आजाराचे प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडून सहा हजार रुपयांची मागणी करणाऱ्या जिल्हा रुग्णालयातील कक्षसेवकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास रंगेहाथ पकडले़ या कक्षसेवकाचे नाव जैलेंद्र शंकर निकम असे असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे़
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारास मणक्याचा आजार असून, न्यायालयीन कामासाठी त्यांना आजाराचे प्रमाणपत्र हवे होते़ त्यासाठी गुरुवारी ते जिल्हा रुग्णालयात गेले होते़ तेथे कक्षसेवक जैलेंद्र शंकर निकम याने प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी सहा हजार रुपयांची मागणी केली़ याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली असता शुक्रवारी जिल्हा रुग्णालयात सापळा रचण्यात आला़
जिल्हा रुग्णालयाच्या गेट नंबर एक शेजारील चहाच्या टपरीजवळ शुक्रवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास कक्षसेवक जैलेंद्र निकम यास तक्रारदाराकडून सहा हजार रुपये घेताना रंगेहाथ पकडण्यात आले़ या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत संशयित निकमवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते़ (प्रतिनिधी)