जिल्हा रुग्णालयातील इन्क्युबेटर दोन दिवसांत कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 04:47 PM2017-09-28T16:47:51+5:302017-09-28T16:48:26+5:30
नाशिक : नाशिक जिल्हा रुग्णालयातील एसएनसीयूमध्ये अतिरिक्त नऊ इन्क्युबेटर पुरविण्यात आली असून, ती येत्या दोन दिवसांत कार्यान्वित करण्यात येतील, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी दिली.
नाशिक जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटरअभावी अर्भकाच्या मृत्यूची घटनेच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी मंत्रालयात वरिष्ठ अधिकाºयांची बैठक घेतली. यावेळी आरोग्यमंत्र्यांनी नाशिकसह राज्यातील एसएनसीयूतील बेडची संख्या याबाबत आढावा घेतला. नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात तातडीने अतिरिक्त इन्क्युबेटर बसविण्यात येतील, असे आरोग्यमंत्र्यांनी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या भेटीदरम्यान सांगितले होते. त्यानुसार अतिरिक्त नऊ इन्क्युबेटर नाशिक जिल्हा रुग्णालयाला देण्यात आले असून, ते येत्या दोन दिवसात कार्यान्वित होतील. त्यामुळे आता याठिकाणी आधीचे १८आणि आत्ताचे ९ अशी एकूण २७ इन्क्युबेटर उपलब्ध होतील यासाठी यंत्रणेने कार्यवाही करावी, असे निर्देशही आरोग्यमंत्र्यांनी दिले. दरम्यान, हरसूल येथील हेमलता कहांडोळे यांचय नवजात शिशुस नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या एसएनसीयुमध्ये दाखल करण्यात आले होते. हे शिशु अतिशय कमी दिवसाचे, कमीवजनाचे होते. वैद्यकीय अधिकारी व अधिपरिचारिका यांनी त्या शिशुला कृत्रिम श्वासोच्छवास दिला. तसेच आवश्यकता भासल्यास सर्फ्याकटंट नावाचे इंजेक्शन देण्यात येणार असल्याची कल्पना नातेवाइकांना देण्यात आली. त्यासाठी त्यांना वैद्यकीय महाविद्यालयात संदर्भित करण्यात आले. त्याचबरोबर शताब्दी रुग्णालयाला संपर्क साधून महात्मा फुले जनारोग्य योजनेंतर्गत या शिशुवर उपचार करण्यासाठी संदर्भित केले. नवजात शिशुला संदर्भित करणपूर्वी योग्य ते उपचार देण्यात आले होते. या शिशुला व्हेंटिलेटरची गरज असल्याने त्याला संदर्भित करण्याचा सल्ला देण्यात आला होता, असे आरोग्य विभागाच्या खुलाशात स्पष्ट करण्यात आले आहे.