जिल्हास्तरीय समितीकडून ग्रामपंचायतींवर ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2018 01:18 AM2018-05-17T01:18:03+5:302018-05-17T01:18:03+5:30
नाशिक : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत असून, या पाहणीदरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत.
नाशिक : तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम आणि द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या जिल्हास्तरीय समितीकडून करण्यात येत असून, या पाहणीदरम्यान अनेक बाबी समोर आल्या आहेत.
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत बुधवारी चांदवड तालुक्यातील राजदेरवाडी ग्रामपंचायतीची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी जिल्हास्तरीय तपासणी केली. तालुकास्तरीय स्पर्धेत प्रथम व द्वितीय आलेल्या ग्रामपंचायतींची जिल्हास्तरीय समितीमार्फत तपासणी करण्यात येत असून, यातून तीन ग्रामपंचायतींची निवड करण्यात येणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. गिते, पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, सहायक गटविकास अधिकारी राजेंद्र देसले यांनी राजदेरवाडी ग्रामपंचायतीला भेट दिली. यावेळी डॉ. गिते यांनी शाळा, अंगणवाडी, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय यांची पाहणी केली. अंगणवाडीत एकही कुपोषित बालक नसल्याबाबत डॉ. गिते यांनी अंगणवाडी सेविकेचा सत्कार केला. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छतागृह तसेच विद्यार्थ्यांसाठीचे स्वच्छतागृह वापरात नसल्याचे निदर्शनास आल्याने गिते यांनी स्वत: शोषखड्डा उघडा करून पाहणी केली.
यावेळी त्यांनी प्राथमिक शाळेतील डिजिटल शिक्षणाबाबत समाधान व्यक्त करून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शालेय पोषण आहाराचा वर्ग उघडून सर्व साहित्याची पाहणी केली. यावेळी शाळेमध्ये विद्यार्थ्यांना बिस्किटे देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. डॉ. गिते यांनी याबाबत तत्काळ चौकशी करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिले.
राजदेरवाडी ग्रामपंचायतीच्या संगणक कक्षास भेट देऊन ई-ग्रामबाबत माहिती घेतली. मात्र तांत्रिक कारणामुळे गेल्या तीन महिन्यांपासून सदरची प्रणाली बंद असल्याचे संगणक परिचालकाने सांगितले. मात्र, सदरची बाब अतिशय गंभीर असून, याबाबत चौकशी करण्याचे व संगणक परिचालकाचे मानधन थांबविण्याचे निर्देश डॉ. गिते यांनी गटविकास अधिकाºयांना दिले. यावेळी घरकुल बांधलेल्या लाभार्थींच्या घरी भेट देऊन घरकुलाची व शौचालयाची पाहणी डॉ. गिते यांनी केली.
यावेळी चांदवड तालुक्याचे गटविकास अधिकारी हिरामण मानकर, विस्तार अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, जिल्हा व तालुका पाणी व स्वच्छता कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.