जिल्हा शासकीय रुग्णालयाचे नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:33 AM2021-01-13T04:33:45+5:302021-01-13T04:33:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये आणि १८ ग्रामीण रुग्णालयांचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : भंडारा येथील दुर्दैवी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालये आणि १८ ग्रामीण रुग्णालयांचे दोन वर्षांपासून इलेक्ट्रिक आणि फायर सेफ्टी ऑडिट झालेले नसल्याचे उघडकीस आले आहे. जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांचे किंवा महापालिकेच्या रुग्णालयांचेदेखील इलेक्ट्रिक ऑडिट झालेले नसताना खासगी रुग्णालयांना मात्र, प्रशासनाकडून दरवर्षी फायर आणि इलेक्ट्रिक ऑडिटबाबत सक्त ताकीद देण्याचे प्रकार सातत्याने घडतात. त्यामुळे या ऑडिटबाबत ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान...’ अशीच शासकीय रुग्णालयांची अवस्था आहे.
भंडारा जिल्हा रुग्णालयातील दहा चिमुकल्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्यामुळे सर्व रुग्णालयांमधील यंत्रणांचे इलेक्ट्रिक आणि फायर ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सर्व हॉस्पिटल्सचे फायर सेफ्टी ऑडिट करण्याचे आदेश राज्य शासनाच्या वतीने आता देण्यात आले असले तरी यापूर्वीच्या काळात इलेक्ट्रिकल ऑडिट का झाले नाहीत, त्याबाबत शासकीय यंत्रणांकडे कोणतेही उत्तर नाही. जिल्हा रुग्णालयाच्या इलेक्ट्रिकल ऑडिटबाबत माहिती घेतली असता रुग्णालयाच्या इमारतीचा फायर सेफ्टी ऑडिट रिपोर्ट महापालिकेकडून प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले. २८ डिसेंबर २०२० या दिवशी हा रिपोर्ट महापालिकेकडे देण्यात आला होता. त्याशिवाय जिल्ह्यातील १८ ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांचेदेखील दोन वर्षांपासून फायर ऑडिट करण्यात आलेले नसल्याने सर्वच यंत्रणा या प्रसंगामुळे पेचात सापडल्या असून सर्वस्तरीय अनास्था उघडकीस आली आहे.
---------------------
ऑडिट सक्तीचे
राज्यातील सर्वसामान्य जनता शासकीय रुग्णालयात विश्वासाने येत असून त्यांना चांगल्या दर्जाच्या आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे प्रशासनाचे कर्तव्य आहे. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही, याची खबरदारी घेण्यासाठी सर्व रुग्णालयाचे फायर व इलेक्ट्रिकल ऑडिट सक्तीचे करण्यात आलेे आहेत. तरीही त्याबाबत शासकीय रुग्णालयांमध्ये असलेली अनास्था हे संबंधित व्यवस्थेच्या हलगर्जीपणाचे आणि कामाबाबत नसलेल्या बांधीलकीचे लक्षण मानले जात आहे.
-----------
काही वायरिंग नवीन
जिल्हा रुग्णालयात गतवर्षी काही ठिकाणी नवीन वायरिंग करण्यात आले आहे. मात्र, अपघात विभाग तसेच महिला प्रसूती कक्षानजीकच्या काही भागात उघड्या वायरिंग दिसून आल्या आहेत. प्रवेशव्दाराजवळच काही दिवसांपूर्वी आग लागण्याचा प्रकारदेखील घडला होता. जिल्हा रुग्णालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिकल विभागाने ऑडिटचे काम केलेले नाही, हे वास्तव आहे.
------------
या उपकरणांचे होते ऑडिट
इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिटमध्ये त्या इमारतीशी निगडित रोहित्रे, जनित्रे, मेन कंट्रोल रूम, वर्कशॉप, प्रत्येक खात्याचा मेन पॅनेल, त्यांची नियमाप्रमाणे सुरक्षित अंतरे, रबर मेटिंग, कॉशन बोर्ड, अग्निरोधके, प्रथमोपचार पेटी, अर्थिंग या सर्व बाबींची पूर्तता नियमांप्रमाणे आहेत की नाहीत ते पाहिले जाते. त्यामुळे भविष्यात विद्युत धोके होणार नाहीत अशी खबरदारी घेतली जाते.
------
ऑडिटबाबत पाठपुरावा करणार
जिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचे इलेक्ट्रिक ऑडिट करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला सांगण्यात आले होते. मात्र, त्यांच्याकडून ते काम अद्याप प्रलंबित आहे. शासनाच्या निर्देशानुसार ते लवकरात लवकर करून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या तांत्रिक प्रक्रियेबाबत सातत्याने पाठपुरावा करून पूर्तता करण्यात येणार आहे.
डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा शल्य चिकित्सक