जिल्ह्याला हवे प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2020 11:48 PM2020-01-23T23:48:38+5:302020-01-24T00:41:24+5:30
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे समन्वयक म्हणून कामकाज करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अनेकविध कारणांमुळे मंत्र्यांचे सातत्याने दौरे होत असल्याने जिल्ह्याला प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारीपद असावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत.
नाशिक : जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांचे समन्वयक म्हणून कामकाज करणाऱ्या नाशिक जिल्ह्यात अनेकविध कारणांमुळे मंत्र्यांचे सातत्याने दौरे होत असल्याने जिल्ह्याला प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारीपद असावे यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात अनेक शाखा आणि विभाग असून त्यासाठी स्वतंत्र अधिकारी आहेत. मात्र मंत्र्यांच्या दौºयासाठी अन्य शहरांप्रमाणे नाशिक जिल्ह्याला प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारी नसल्याची बाब समोर आल्यानंतर यासाठीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.
राजकीय, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्र असल्याने नाशिक जिल्ह्यात सातत्याने मंत्र्यांचे दौरे सुरू असतात. चार जिल्ह्यांचे विभागीय कार्यालय, दोन महापालिका, दोन विद्यापीठे, श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर आणि वणी असे धार्मिक क्षेत्र असल्यामुळे नेते आणि व्हीआयपी मान्यवरांचे दौरे सातत्याने सुरू असतात.
या सर्वांना शासकीय प्रोटोकॉल असल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या यंत्रणेवर दौºयाची जबाबदारी येत असते. जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जाचे विविध अधिकारी विभागाचे कामकाज पाहत आहेत. औरंगाबाद, पुणे आणि मुंबई यांसारख्या शहरात मंत्री आणि व्हीआयपी लोकांच्या दौºयासाठी खास प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारी पदाची निर्मिती करण्यात आलेली आहे. नाशिकमध्ये मात्र अजूनही अशाप्रकारचे पद निर्माण करण्यात आलेले नाही. जिल्ह्याच्या नव्या आकृतिबंधामध्ये अशाप्रकारचे पद असावे यासाठीचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी, जिल्हा दंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तसेच पुरवठा, कुळकायदा, जमीन कमाल मर्यादा, महसूल, सामान्य शाखा, लेखा, गृह, टंचाई, आपत्ती व्यवस्थाप, रेकॉर्ड अशी अनेक खाती आहेत. व्हीआयपी आणि नेत्यांच्या दौºयांसाठी शक्यतो त्या खात्याच्या अधिकाºयाकडे दौरा नियोजनाची जबाबदारी दिली जाते. त्यालाच संपर्क अधिकारी असेही म्हटले जाते. जिल्ह्यात मंत्र्यांचे एकूणच होणारे दौरे तसेच व्हीआयपी मान्यवरांच्या भेटी लक्षात घेता जिल्हा प्रशासनात स्वतंत्र प्रोटोकॉल अधिकारी असावा यासाठी जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. नव्या आकृतिबंधात याचा समावेश केला जाणार आहे. सदर तरतूद मंजूर झाल्यास अन्य अधिकाºयांची धावपळ कमी होणार आहे.
नाशिकचे महत्त्व अधिक
राजकीय, सामाजिक तसेच धार्मिकदृष्ट्याही नाशिकला महत्त्व प्राप्त झाल्याने कोणत्याही उपक्रमाची सुरुवात नाशिकमधून करण्याला शक्यतो प्राधान्य दिले जाते किंबहुना विभागीय बैठका, शासकीय योजनांचा नारळही नाशिकमधून वाढविला जातो. जिल्ह्याला पालकमंत्री असल्याने त्यांचे सातत्याने दौरे होत असतात. कृषी मंत्रिपदीदेखील नाशिक जिल्ह्यातीलच असल्यामुळे त्यांचेही दौरे सुरू असतात. दर शनिवार, रविवारीदेखील व्हीआयपी मान्यवरांचे दौरे होतात. त्यामुळे नाशिकसाठी प्रोटोकॉल उपजिल्हाधिकारी पदाचे महत्त्व अधोरेखित होते.