आहेरवाडीची जिल्हा परिषद शाळा झाली डिजिटल !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 06:30 PM2019-02-12T18:30:13+5:302019-02-12T18:30:54+5:30
राजापूर : येथील केंद्रकक्षेतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेरवाडी येथे चौदाव्या वित्त आयोगाच्या निधीतून सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात शाळेला डिजिटल साहित्य देण्यात आले होते. वर्षभरापूर्वीच मिळालेल्या या साहित्याचा उपयोग करून शाळेतील शिक्षकच नव्हे; तर विद्यार्थीही तंत्रस्नेही झाले आहेत.
या डिजिटल साहित्यामध्ये स्मार्ट टीव्ही, सीपीयू, स्पीकर्स इत्यादींचा समावेश होता. तसेच लोकसहभागाद्वारे सांस्कृतिक कार्यक्र माच्या माध्यमातून शाळेसाठी प्रिंटर उपलब्ध करण्यात आले. या साहित्याच्या वापरामुळे आज विद्यार्थीही तंत्रसाक्षर झाले आहेत. झपाट्याने बदलणाऱ्या तसेच रोज नवीन माहितीच्या निर्मितीत होणाºया बदलामुळे आजच्या काळात डिजिटल साक्षर असणे ही काळाची गरज बनली आहे. तसेच शासनस्तरावरही याला महत्व देऊन शिक्षणात याला स्थान देण्यात आले आहे. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विदयार्थी विविध प्रकारचे साहित्य शोधून अनुभव समृद्ध होण्यास मदत होत आहे. पुढील काळातील नोकरी, व्यवसाय, शिक्षण यांचा मूळ पायाच तंत्रज्ञान बनत चालला आहे. त्यामुळे हे पायाभूत ज्ञान विद्यार्थ्यांना असले पाहिजे जेणे करून त्यांच्या व्यावसायिक शिक्षणालाही हातभार लागेल. आहेरवाडी शाळेतील अनेक विद्यार्थी स्वत: संगणक, लॅपटॉप हाताळत आहेत. फोटो प्रिंट, आॅनलाईन प्रिंट काढणे हे तर सहजगत्या करीत आहेत. आज विविध कोर्स करूनही असे संगणक ज्ञान सहसा मिळत नाही किंवा हाताळता येत नाही. याबाबत ग्रामस्थ, सरपंच, ग्रामपंचायत सद्स्य, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्य, ग्रामविकास अधिकारी यांनी वेळोवेळी पाहणी करून समाधान व्यक्त करुन विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणकिदृष्ट्या महत्वाच्या अशा तांत्रिक बाबीविषयी शिक्षक सतत मार्गदर्शन करीत असतात. यामध्ये विद्यार्थी करीत असलेल्या बाबी म्हणजे संगणक व मोबाईल जोडणी, आॅनलाईन शैक्षणिक माहिती शोधणे, वायफाय इंटरनेट जोडणी, मोबाईल व संगणक तसेच लॅपटॉप मधून माहितीची देवाणघेवाण करणे, संगणकावर विविध फाइल्स बनवणे, पोस्टर्स व बॅनर बनवणे, प्रिंट काढणे, झेरॉक्स करणे, वर्गाबाहेरील कार्यक्र माचे वर्गातील स्मार्ट टीव्हीवर थेट प्रक्षेपण करणे, पेनड्राईव्हचा वापर आदी बाबी विद्यार्थी लिलया हाताळू लागले आहेत. गावातच ही सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आॅनलाईन प्रिंट तसेच झेरॉक्स कामासाठी ग्रामस्थांची सुमारे दहा कि.मी.ची पायपीट कमी झाल्यामुळे ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. विद्यार्थ्यांना डिजिटल साक्षर करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षक शांतीनाथ वाघमोडे, सचिन शेंडगे, सर्जेराव बडक, चंद्रशेखर ठोंबरे, वाल्मिक नवले व मुख्याध्यापक परशुराम गडकर आदी शिक्षक मार्गदर्शन करीत आहेत.