पाटणे सोसायटी सभापतींविरोधातील अविश्वास बारगळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:14 AM2021-01-21T04:14:56+5:302021-01-21T04:14:56+5:30
पाटणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभापती जीवन वेडू अहिरे यांच्याविरुद्ध १३ पैकी ९ संचालकांनी ...
पाटणे : येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे सभापती जीवन वेडू अहिरे यांच्याविरुद्ध १३ पैकी ९ संचालकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव बारगळला आहे. सभापती अहिरे हे मनमानी पद्धतीने कामकाज करतात, अशी तक्रार करून अविश्वास प्रस्ताव दाखल करण्यात आला होता.
बुधवारी (दि. २०) उपनिबंधक सहकारी संस्था, मालेगाव यांच्या कार्यालयात उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे यांच्या अध्यक्षतेखाली पाटणे सोसायटीचे सभापती जीवन वेडू अहिरे यांच्याविरुद्ध १३ पैकी ९ सदस्यांनी दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला अविश्वास प्रस्ताव दाखल करणारे ८ संचालक उपस्थित तर ३ संचालक गैरहजर होते. सभापती जीवन अहिरे व संचालक बाळासाहेब पगारे यावेळी उपस्थित होते. या विशेष सभेचे अध्यक्ष उपनिबंधक बदनाळे यांनी अविश्वास ठराव फेटाळला गेल्याचे जाहीर केले. अविश्वास ठराव मंजूर करण्यासाठी ठरावाच्या बाजूने ९ संचालक उपस्थित नसल्याने अखेर हा अविश्वास ठराव फेटाळला गेल्याने सभापती जीवन अहिरे यांचे पद अबाधित राहिले.
मी स्वतः ३ लाख ३१ हजार रुपयांची देणगी संत सावता महाराज व महादेव मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दिली आहे. लोकवर्गणीची सर्व रक्कम हिंदू देवालय ट्रस्टच्या खात्यावर जमा केली आहे. सावता महाराज मंदिर व महादेव मंदिर बांधकाम व कळस उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे. परंतु, मला सभापती पदावरून दूर करण्याचे षड्यंत्र रचले जात आहे, ते दुदैवी आहे.
- जीवन अहिरे, सभापती