प्रचलित सामाजिक, राजकीय व्यवस्था अस्वस्थ करणारी : डॉ. भालचंद्र मुणगेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 01:49 AM2021-12-06T01:49:49+5:302021-12-06T01:50:56+5:30
केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच खिळखिळी झाली असून, २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संपूर्ण लोकशाहीच उद्ध्वस्त होईल, असा जाहीर इशारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला.
नाशिक : केंद्र शासनाने मागील काही वर्षांत घेतलेले सामाजिक आणि आर्थिक निर्णय या देशाला अधोगतीकडे घेऊन जाणारे असून, असे बेजबाबदार निर्णय आजपर्यंत जगातील एकाही सरकारने घेतले नाहीत. यामुळे प्रचलित सामाजिक, राजकीय आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. यामुळे संपूर्ण लोकशाही व्यवस्थाच खिळखिळी झाली असून, २०२४ मध्ये हे सरकार पुन्हा सत्तेत आले तर संपूर्ण लोकशाहीच उद्ध्वस्त होईल, असा जाहीर इशारा प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ आणि मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी १५ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना दिला. मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या अभिनव बाल विकास मंदिराच्या प्रांगणात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संविधान सन्मानार्थ १५व्या विद्रोही साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी (दि.५) झाला. याप्रसंगी डॉ. भालचंद्र मुणगेकर बोलत होते. व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, स्वागताध्यक्ष शशिकांत उन्हवणे, मुख्य संयोजक कॉ. राजू देसले, संयोजन समितीच्या राज्य अध्यक्ष प्रा. प्रतिमा पवार, विश्वस्त किशोर ढमाले, गणेश उन्हवणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी बोलताना डॉ. मुणगेकर म्हणाले, धारावीतील पहिल्या साहित्य संमेलनापासून मी विद्रोही साहित्य चळवळीशी संबंधित आहे. सध्या देशात असलेली प्रचलित सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था अस्वस्थ करणारी आहे. याविरुद्ध बोलले नाही तर अनेक प्रश्न निर्माण होतील. असे सांगतानाच त्यांनी कोरोनानंतर २२ देशांतील २२ कोटी नागरिकांचा रोजगार गेला आणि २३ कोटी नागरिक दारिद्र्यरेषेच्या खाली गेले असल्याची वस्तुस्थितीही मांडली. आपल्या भाषणात मुणगेकर यांनी गोहत्या, विद्रोही साहित्य त्यापुढील आव्हाने अशा विविध मुद्द्यांचा उहापोह केला. मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार यांनी आपल्या भाषणात विद्रोही साहित्य संमेलन सामाजिक चळवळीला गती देणारे असल्यचे मत व्यक्त करून मविप्र समाज संस्थेच्या संचालकांनी त्या काळात प्रथम विद्रोह केला आणि बहुजनांच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. त्याचबरोबर इगतपुरीच्या भात सत्याग्रहाचे नेतृत्व केल्याचे सांगून संस्थेचा इतिहास मांडला. या संमेलनात एकूण १३ ठराव करण्यात आले. प्रा. प्रतिमा परदेशी यांनी ठरावांचे वाचन केले, आभार कॉ. राजू देसले यांनी मानले.
चौकट-
तीन ठिकाणचे निमंत्रण
१६ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी जालना, अहमदनगर आणि जळगाव या तीन ठिकाणांहून निमंत्रण आले असल्याची माहिती यावेळी मुख्य विश्वस्त किशोर ढमाले यांनी यावेळी दिली. संमेलन कुठे घ्यायचे याचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
चौकट-
सावरकरांच्या नावावर निवडणुका
अ.भा. मराठी साहित्य संमेलन नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, त्यांचे मराठीत योगदान आहेच. असे असताना त्यांच्या नावाला विरोध आणि सावरकरांच्या नावाचा आग्रह का, असा प्रश्न डॉ. मुणगेकर यांनी उपस्थित केला. आता राम मंदिराचा प्रश्न मिटला आहे, इतरही कोणते मुद्दे नसल्याने महाराष्ट्रात यापुढील अगदी पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्याही निवडणुका सावरकरांच्या नावावरच होतील, असे मत त्यांनी व्यक्त केले.