आता दिव्यांग मतदारांचा घ्यावा लागणार शोध !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 02:42 PM2018-08-02T14:42:52+5:302018-08-02T14:50:01+5:30

Divaning voters should now be searched! | आता दिव्यांग मतदारांचा घ्यावा लागणार शोध !

आता दिव्यांग मतदारांचा घ्यावा लागणार शोध !

Next
ठळक मुद्देआयोगाची विशेष मोहिम : शासकीय यंत्रणा, संघटनांना आवाहन निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा

नाशिक : आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा तसेच मतदानाच्या अधिकारापासून कोणी वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाने यावर्षी ‘सुलभ निवडणूका’ हे घोषवाक्य जाहीर करून त्यामाध्यमातून आता दिव्यांगांचा समावेश मतदार यादीत करण्याचे ठरविले असून, आॅगष्ट महिन्यात यासाठी विशेष मोहिम राबविण्यास सुरूवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ४२ लाख मतदारांमधून दिव्यांग मतदारांचा शोध घेण्याचे नवीन आव्हान यंत्रणेपुढे उभे ठाकले आहे. त्यासाठी शासकीय कार्यालये, अपंगासाठी काम करणाऱ्या संस्था, संघटनांची मदत घेण्यात येणार आहे.
लोकशाही व्यवस्था अधिकाधिक बळकट करण्यासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी निवडणूक आयोग हरत-हेचे प्रयत्न करीत असून, त्याचाच एक भाग म्हणून मतदानापासून वंचित राहणा-या घटकांची मतदार म्हणून नोंद करण्याची विशेष मोहिम राबविली जात आहे. यापुर्वी तृतीयपंथी, लष्करातील जवान यांच्यासाठी मतदार नोंदणी मोहिम घेण्यात आली आता त्याच धर्तीवर दिव्यांग मतदारांनाही मतदानाचा हक्क स्वाभीमानाने बजाविता यावा यासाठी अगोदर त्यांना मतदार म्हणून नोंदविण्यात येणार आहे. आजवरच्या मतदार यादीत दिव्यांग मतदारांची स्वतंत्र नोंद नसल्याने त्यांची नावे मतदार यादीत असले तरी, त्यांची ओळख पटविणे मुश्किल आहे. अशा परिस्थिती निवडणूक शाखेने अपंगांना प्रमाणपत्र देणा-या जिल्हा शासकीय रूग्णालये, अपंगासाठी योजना राबविणा-या समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग याशिवाय महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून अपंग कर्मचा-यांची माहिती मागविण्यात आली आहे. या शासकीय कार्यालयांकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात दिव्यांगाची संख्या सुमारे २० ते २२ हजाराच्या आसपास असून, त्यांची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान असल्यामुळे आता त्यासाठी अपंगासाठी काम करणा-या स्वयंसेवी संस्था, संघटनांनाही याकामात सहभागी करून घेण्यात येणार आहे. सध्या सुरू असलेल्या मतदार पुर्नरिक्षण मोहिमेंतर्गंत बीएलओ घरोघरी जावून माहिती गोळा करीत असतांना त्याच वेळी दिव्यांगाचा शोध घेण्याच्या सुचना आयोगाने दिल्या आहेत. दिव्यांगांचा मतदार म्हणून नोंद करतानाच त्यांच्या समस्याही जाणून घेत त्याच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करण्याचा मानस आयोगाने बोलून दाखविला आहे.
दिव्यांगाची माहिती गोळा करण्याचा भाग म्हणून गुरूवारी जिल्हा निवडणूक शाखेने प्रहार संघटनेच्या पदाधिका-यांना पाचारण करून त्यांच्याकडे नोंदणी असलेल्या दिव्यांगाची माहिती निवडणूक शाखेला देण्याची सुचना करण्यात आली आहे. यावेळी तहसिलदार गणेश राठोड, नायब तहसिलदार अमित पवार उपस्थित होते.

 

Web Title: Divaning voters should now be searched!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.