दिवेआगार गणेश मंदीर दरोडा-हत्याकांडातील फरार अट्टल गुन्हेगारास बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 07:39 PM2020-10-26T19:39:45+5:302020-10-26T19:43:44+5:30
सुनावणी पुर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता.
नाशिक: रायगड जिल्ह्यातील दिवेआगार येथील गणपती मंदिरावर दरोडा टाकून तेथील दोन सुरक्षारक्षकांच्या हत्येप्रकरणी मोक्का न्यायालयाने सुनावलेली जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना दोन वर्षांपुर्वी पोलिसांच्या हातातून निसटून जाण्यास यशस्वी ठरलेल्या अट्टल गुन्हेगाराच्या अखेर येवला पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुसक्या बांधल्या. त्याच्याकडून येवल्यात आठवडाभरापुर्वी झालेल्या घरफोड्यांच्या गुन्ह्यांसह अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सडपातळ बांधा अन् साडेचार फूटापेक्षा अधिक उंची नसलेला मात्र वयाच्या १९ वर्षांपासूनच गुन्हेगारीकडे वळून राज्यात संघटित गुन्हेगारीची बीजे पेरुन खून, दरोडे, खूनासह दरोडे, घरफोड्या, जबरी लूट यांसारखे गंभीर स्वरुपाचे राज्यातील विविध जिल्ह्यांत तब्बल २८ गुन्हे दाखल असलेला विशेष मोक्का न्यायालयाने सुनावलेल्या डझनभर आरोपींपैकी एक असलेला सतीश उर्फ सत्या जैनु काळे (२६,रा.बिलवणी, ता.वैजापुर, जि.औरंगाबाद) यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा २०१२साली सुनावली होती. काळे हा नागपूर येथील कारागृहात शिक्षा भोगत असताना २०१८साली एका खटल्याच्या सुनावणीसाठी त्यास निफाड सत्र न्यायालयात पोलिसांनी हजर केले होते. सुनावणी पुर्ण होताच त्यास पोलीस बंदोबस्तात रेल्वेतून नागपूरला घेऊन जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या हातावर तुरी देऊन काळे हा फरार झाला होता.
१९ ऑक्टोबर २०२० रोजी नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या हद्दीतील येवला तालुक्यातील खरवंडी, रहाडी या दोन गावांत घरफोड्यांची मालिका रात्रीच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलीस अधिक्षक सचिन पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या आदेशानुसार सहायक निरक्षक एकनाथ भिसे, उज्वलसिंह राजपुत यांनी विविध तपासपथके तयार केली आणि तालुक्यासह जिल्हाभरात गुन्हेगारांचे झडतीसत्र हाती घेतले.
नाव बदलून येवला-वैजापूर सीमेवर वावर
यावेळी येवला-वैजापुर सिमेवर मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे तपासी पथकाने सापळा रचून काळे यास बेड्या ठोकल्या. येवल्यात घरफोड्या केल्यानंतर काळे हा फरार झाला. दोन्ही तालुक्यांच्या परिसरात दोन वर्षांपासून काळे हा शिवा जनार्दन काळे असे नाव बदलून येवला, वैजापूर, औरंगाबाद या शहरांमध्ये वावरत होता.
--
आंतरराज्यीय टोळीचा प्रमुख असलेला मोक्कांतर्गत जन्मठेपेची शिक्षा झालेला अट्टल आरोपी सतीश उर्फ सत्या यास तपासी पथकाने ज्या कौशल्याने व तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने गजाआड केले त्या तपासी पथकाला २५ हजारांचे बक्षीस दिले जाणार आहे. दिवेआगार गणपती मंदीरात दरोडा टाकून तेथील दोन सुरक्षारक्षकांची कुऱ्हाडीने निघृणपणे हत्या करुन फरार झालेल्या टोळीमधील सतीश हा प्रमुख आरोपी आहे. त्यास न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा यापुर्वीच सुनावली आहे. राज्यातील पुणे, महाड, रायगड, औरंगाबाद आदि जिल्ह्यांत त्याच्याविरुध्द २८ गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहे. त्याने सहाठिकाणी दरोड्यासह माणसांना ठार मारले आहे.
-सचिन पाटील, अधीक्षक, नाशिक