..दुभाजक रंगले, माती उचलली अन रस्ते झाले चकाचक; पीएम नरेंद्र मोदी नाशिकला दौऱ्यावर येणार
By Suyog.joshi | Published: January 9, 2024 03:07 PM2024-01-09T15:07:51+5:302024-01-09T15:09:41+5:30
नवीन आडगाव नाक्याकडून जाणारा एक बाजूचा रस्ता तर मागील दोन दिवसांपासून लोखंडी बॅरॅकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे.
पंचवटी (संदीप झिरवाळ) : नाशिकला होणाऱ्या २७ व्या युवा महोत्सवाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी (दि.१२) नाशिकला दौऱ्यावर येणार असल्याने संपूर्ण शासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. पंतप्रधान मोदी तपोवनात येणार म्हणून छत्रपती संभाजी नगर मार्गावर गेल्या तीन ते चार दिवसांपासून रस्त्यावर पाणी मारणे, दुभाजक रंगरंगोटी करणे, रस्त्यावर वर्षानुवर्षे साचलेली माती काढणे, दुभाजक जाळ्या बदलणे या कामाला प्राधान्य दिले जात असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी ज्या मार्गाने रोड शो करणार आहे त्या मार्गावर रस्त्यावर आलेल्या झाडाच्या फांद्या छाटण्यापासून ते दुभाजक रंगरंगोटी उड्डाण पुलाचे पिलर असो की मग रस्त्यावर पांढरे पट्टे झेब्रा क्रॉसिंग रंगरंगोटी काम, रस्ता डांबरीकरण, खड्डे बुजविणे, उड्डाण पूल पाणी मारून धुवणे काम वेगाने सुरु आहे. नवीन आडगाव नाक्याकडून जाणारा एक बाजूचा रस्ता तर मागील दोन दिवसांपासून लोखंडी बॅरॅकेडिंग लावून बंद करण्यात आला आहे.
या रस्त्यावर असलेले वाहतूक बेट रंगरंगोटी रस्त्यावर साचलेली खडी, माती उचलणे काम सुरू आहे. रस्त्यावर अडथळा निर्माण करणाऱ्या हातगाड्या टपऱ्या, गॅरेज तात्पुरते बाजूला काढून रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त का होईना वर्षानुवर्ष धूळ खात पडलेले रस्ते, वाहतूक बेट तसेच गाळ व चिखलाने माखलेले दुभाजक स्वच्छ करत त्यावर रंग चढविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतल्याने छत्रपती संभाजी नगर मार्गाला झळाळी आली आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून मोलमजुरी करणारे कामगार रात्री उशिरापर्यंत रस्ते साफसफाई काम करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.