प्रभातार्इंच्या स्वरात ईश्वरीय ताकद
By admin | Published: February 15, 2015 11:25 PM2015-02-15T23:25:30+5:302015-02-15T23:26:09+5:30
पंडित जसराज : प्रभा अत्रे यांना पं. भीमसेन जोशी ‘जीवनगौरव’ प्रदान
नाशिक : मी वयाने मोठा असलो, तरी गायनातल्या अधिकारात प्रभाताई सर्वार्थाने मोठ्या आहेत. त्यांची या क्षेत्रातील उंची मोजण्यापलीकडची आहे. त्या जे गातात, ते आणि तसेच आजूबाजूला घडत असल्याचा आभास निर्माण होतो, एवढी अद्वितीय ताकद परमेश्वराने त्यांच्या स्वरांना दिली आहे, अशी स्तुतिसुमने उधळत स्वरमार्तंड पंडित जसराज यांनी शास्त्रीय गायिका स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांना पंडित भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले. यानिमित्ताने जणू स्वरगंगेचाच सन्मान केल्याचा अनुभव नाशिककरांना या सोहळ्यात आला.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा पं. भीमसेन जोशी जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा महाकवी कालिदास कलामंदिरात रंगला. पुरस्काराचे यंदाचे तिसरे वर्ष होते. यापूर्वी किशोरी आमोणकर व पं. जसराज यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यंदा डॉ. अत्रे यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला. पाच लक्ष रुपये, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे, पुरस्कार निवड समितीचे सदस्य पं. प्रभाकर कारेकर, खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार बाळासाहेब सानप, जयवंत जाधव, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष विजयश्री चुंबळे, सांस्कृतिक संचालनालयाचे संचालक अजय आंबेकर, संजय भोकरे आदि व्यासपीठावर उपस्थित होते.
पुरस्कार प्रदान केल्यानंतर पं. जसराज म्हणाले की, साठ वर्षांपूर्वी प्रभातार्इंशी पहिल्यांदा भेट झाली. तेव्हाही त्या आजइतक्याच चांगल्या गात होत्या. त्यांचा त्यावेळी ऐकलेला पुरिया कल्याण राग अजूनही स्मरणात आहे. त्या ‘होवन लागी सांज’ गात होत्या, तेव्हा जणू खरोखरच संध्याकाळ झाली आहे, असा भास होत होता. कोलकात्यात पं. शिवकुमार शर्मा यांच्यासह प्रभातार्इंची मैफल ऐकली. निवडक चार-पाच जण मैफलीला उपस्थित होते. त्यातले काही जण प्रभातार्इंनंतर गाणार होते; मात्र प्रभातार्इंनी ‘ललित’ असा गायला की, त्यानंतर बाकी कलावंतांनी गाण्याबिण्याचा विषयही काढला नाही आणि चहाला जाण्याची भाषा करू लागले! संगीतातला असा कोणताही पैलू नाही, जो प्रभातार्इंकडे नाही, असे गौरवोद्गारही त्यांनी काढले. सन्मानाला उत्तर देताना डॉ. प्रभा अत्रे यांनी प्रारंभी राज्य शासनाने आपली उशिरा दखल घेतल्याबद्दल किंचित नाराजी व्यक्त केली; मात्र ही आपलीच माणसे असल्याने त्यांना सांभाळून घेऊ, अशी पुस्तीही जोडली. त्या पुढे म्हणाल्या, हा आपला नव्हे, तर शास्त्रीय संगीताचा, साधनेचा, आई-वडील, गुरू आणि सर्व श्रोत्यांचा सन्मान आहे.
वारसा नसताना मी या क्षेत्रात आले आणि गुरूंनी भरभरून दिल्याने गायिका होऊ शकले. संगीताची रूढ वाट सोडून परिवर्तनवादी विचार मांडल्याने अनेक कलाकार, समीक्षकांकडून खूप त्रास सहन करावा लागला; पण मी जिद्दीने चालत राहिले. संगीताने मला खूप काही दिले. आज रक्ताची माणसे नाहीत; पण सुरांनी अनेक घट्ट नाती जोडली आहेत, अशा कृतार्थ शब्दांत त्यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.
अजय आंबेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अत्रे यांच्या कर्तृत्वाचा गौरव करणारी लघुचित्रफीत यावेळी दाखवण्यात आली. स्वानंद बेदरकर व सुनेत्रा महाजन यांनी सूत्रसंचालन केले. सहसंचालक मनोज सानप यांनी आभार मानले.
इन्फो :
सांस्कृतिक कार्यक्रमांत राजकारणी नकोत!
विनोद तावडे यांनी कार्यक्रमात चौफेर फटकेबाजी केली. सांस्कृतिक कार्यक्रमांत फक्त कलावंतांनीच व्यासपीठावर बसावे, राजकारण्यांनी पहिल्या रांगेत बसावे, अशी आपली भूमिका आहे. आपण याची सुरुवातही केली; परंतु काही नेत्यांनी ‘आम्हाला एवढीच संधी असते’ म्हणत हतबलता व्यक्त केली; मात्र लवकरच यासंदर्भात सर्व पक्षांशी बोलून सूत्रबद्ध रचना करणार असल्याचे त्यांनी सांगितले. नेते पहिल्या रांगेत बसून जेवढे गुण मिळवतात, तेवढेच गुण ते व्यासपीठावर बसून घालवतात, अशी पुस्तीही त्यांनी यावेळी जोडली.
अत्रे यांचे तावडे यांना पत्रशास्त्रीय संगीताला प्रतिष्ठा मिळवून देण्यात पं. विष्णू नारायण भातखंडे, पं. विष्णू दिगंबर पलुस्कर आणि स्त्री संगीतकारांना मानाचे स्थान मिळवून देण्यात हिराबाई बडोदेकर यांचे योगदान आहे. या व्यक्तींच्या नावाने शासनाने पुरस्कार सुरू करावेत, महोत्सव भरवावेत वा संस्थांना नावे द्यावीत, अशी मागणी डॉ. प्रभा अत्रे यांनी विनोद तावडे यांच्याकडे केली. त्यांना तसे पत्रही दिले.