प्रभाग १३: पोटनिवडणुकीत चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 01:18 AM2018-03-20T01:18:02+5:302018-03-20T01:18:02+5:30
महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनीही अर्ज दाखल केला असून, त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे.
नाशिक : महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ मधील पोटनिवडणुकीत चुरशीचा सामना होण्याची चिन्हे दिसू लागली असून, बिनविरोध निवडीची शक्यता मावळली आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेकडून स्नेहल संजय चव्हाण यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर माजी नगरसेवक माधुरी मिलिंद जाधव यांनीही अर्ज दाखल केला असून, त्यांनी भाजपाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. दरम्यान, शिवसेना ताकदीनिशी निवडणूक रिंगणात उतरल्याने भाजपानेही निवडणूक लढविण्याची तयारी केली असून, दोघा इच्छुक उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क)मधील मनसेच्या नगरसेवक सुरेखा भोसले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ६ एप्रिलला पोटनिवडणूक होणार आहे. त्यासाठी मंगळवारी (दि.२०) नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे. सोमवारी (दि.१९) शिवसेनेचे नवनियुक्त महानगरप्रमुख सचिन मराठे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोटनिवडणुकीसाठी माजी नगरसेवक संजय चव्हाण यांच्या कन्या स्नेहल चव्हाण यांची उमेदवारी घोषित केली. त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी रोहिदास बहिरम यांच्याकडे स्नेहल चव्हाण यांनी पक्षाच्या एबी फॉर्मसह उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, मनपातील विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते, गटनेता विलास शिंदे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी महापौर विनायक पांडे, सुधाकर बडगुजर, माजी महापौर यतिन वाघ, रवींद्र जाधव आदी उपस्थित होते. स्नेहल चव्हाण यांनी मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ९५९३ मते घेतली होती.
भोसलेंंना अपक्ष लढण्याचा प्रस्ताव?
भोसले कुटुंबीयातील सदस्याने मनसेकडून निवडणूक लढविल्यास पाठिंबा देणे राजकीयदृष्ट्या गैरसोयीचे ठरणार असल्याने भोसले यांनी अपक्ष म्हणून निवडणुकीत उमेदवारी करावी. तसे झाल्यास भाजपाकडून उमेदवार दिला जाणार नाही, असे आश्वासन देण्यात आल्याचे समजते. त्यामुळेच सोमवारी (दि.१९) वैशाली भोसले यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करून ठेवला आहे.