‘निसर्गा’मुळे ताटातूट : अखेर त्या बिबट पिल्लाची बोरिवलीला रवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 07:12 PM2020-06-04T19:12:12+5:302020-06-04T19:15:02+5:30
मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले...
नाशिक : पाथर्डी-गौळाणे रस्त्यावरील कोंबडे मळ्यात जन्मलेल्या बिबट्याच्या बछड्यांपैकी एका बछड्याची पुर्नभेट घालून देण्यास वनविभागाला यश आले; मात्र मंगळवारी (दि.२) दुपारी पुन्हा याच शेतात सापडलेल्या दुसऱ्या बछड्याची मादीसोबत भेट घडवून आणण्यास ‘निसर्गा’ने अडथळा निर्माण केला. अखेर या बछड्याची रवानगी बोरिवलीच्या संजय गांधी राष्टÑीय उद्यानात गुरूवारी (दि.४) करण्यात आली.
वालदेवीच्या काठालगत असलेल्या यशवंतनगरमधील कोंबळे मळ्यात सलग दोन दिवस बिबट्याची दोन पिल्ले आढळून आली. सोमवारी सकाळी आढळलेल्या पहिल्या पिल्लाला त्याच रात्री मादी पुन्हा सोबत घेऊन गेली. मंगळवारी दुपारी पुन्हा येथील शेतात दुसरे पिल्लू शेतमजुरांना मिळून आले. हे पिल्लू वनविभागाचे कर्मचारी व इको-एको फाउण्डेशनच्या वन्यजीवप्रेमींनी पुर्नभेटीसाठी तसेच संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास शेतात एका कॅरेटमध्ये ठेवले; मात्र पावसाची रिपरिप मंगळवारी रात्रीपासूनच सुरू झाल्याने कदाचित या पिलाची आई त्याला घेण्यासाठी येऊ शकली नाही. बुधवारी दिवसभर ढगाळ हवामान आणि सुरू असलेल्या पावसामुळे या पिल्लाची पुर्नभेट घडविणे शक्य झाले नाही. त्यामुळे बछड्याची उपासमार होऊ नये म्हणून पश्चिम वनविभागाचे उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांच्या आदेशान्वये गुरूवारी मादी पिलाला गांधी उद्यानात वनक्षेत्रपाल विवेक भदाणे यांनी पोहचविले.