दिव्यांगांनी अधिकारांप्रती जागरूक राहावे : इंद्रजित नंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 01:17 AM2018-03-25T01:17:10+5:302018-03-25T01:17:10+5:30
२००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात येऊन अपंग व विकलांग ऐवजी दिव्यांग शब्दप्रयोग करण्यात येऊन प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल अशी तरतूद करण्यात आली़ मात्र, या तरतुदी केवळ कागदावरच असून, त्याची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाने आपल्या अधिकारांप्रती जागृत राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंजाब येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा सातव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष इंद्रजित नंदन यांनी केले़
नाशिक : २००६ मध्ये युनोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत सामान्य माणसांप्रमाणेच दिव्यांगानाही शिक्षण, रोजगार, आरोग्यसुविधा, सामाजिक सन्मान तसेच समान संधीबाबत चर्चा झाल्यानंतर भारत सरकारने दिव्यांगांसाठी कायदा मंजूर केला़ या कायद्यात २०१६ मध्ये बदल करण्यात येऊन अपंग व विकलांग ऐवजी दिव्यांग शब्दप्रयोग करण्यात येऊन प्रत्येकाला सन्मानाने जगता येईल अशी तरतूद करण्यात आली़ मात्र, या तरतुदी केवळ कागदावरच असून, त्याची अंमलबजावणी केली जात नाही, त्यामुळे प्रत्येक दिव्यांगाने आपल्या अधिका रांप्रती जागृत राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन पंजाब येथील प्रसिद्ध साहित्यिक तथा सातव्या अखिल भारतीय दिव्यांग साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष इंद्रजित नंदन यांनी केले़ नाशिकमधील गंगापूररोडवरील विश्वास लॉन्समध्ये आयोजित संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या़ नंदन पुढे म्हणाल्या की, सरकारने केलेल्या या नवीन कायद्यात पूर्वी केवळ सात श्रेणी होत्या, त्यामध्ये बदल करून २१ श्रेणी करण्यात आल्या आहेत़ यातील अॅसिड हल्ल्यामध्ये बळी ठरलेल्या तसेच पार्किंसन्स डिसीजचाही समावेश करण्यात आला ही उल्लेखनीय बाब आहे़ या कायद्यानुसार ६ ते १८ वर्षांच्या मुलाला मोफत शिक्षण, स्वतंत्र शिक्षक, दिव्यांगांसाठी स्वतंत्र न्यायालय, अपंगांना हीन लेखून बोलणाऱ्यांना कडक शिक्षा यांचा समावेश आहे़ या कायद्याची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्यास दिव्यांगांचे जीवनमान सुधारणार आहे़ सरकारने तयार केलेल्या या कायद्यांची प्रभावी अंमलबजावणी होत नसून जिल्हा प्रशासनाने दिव्यांगांप्रती संवेदनशील असणे गरजेचे आहे़ तसेच दिव्यांगांनी आपल्या अधिकारांप्रती जागरूक असणे गरजेचे असून स्वातंत्र्यासाठी जसा संघर्ष करावा लागतो तसाच अधिकारांसाठी दिव्यांगांना संघर्ष करावा लागणार आहे़ दिव्यांगामधील सकारात्मक आत्मविश्वासामुळे आतापर्यंत कोणत्याही दिव्यांगाने आत्महत्या केली नसल्याचे नंदन यांनी सांगितले़ संमेलनाचे स्वागताध्यक्ष विश्वास ठाकूर यांनी उद्योग, साहित्य, प्रशासन यांसह सर्वच क्षेत्रांत दिव्यांगांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे़ त्यांना समाजाकडून सहानुभूती नकोय, तर समान संधी व समान सन्मान हवा असल्याचे सांगितले़ साहित्य व सांस्कृतिक मंडळ अध्यक्ष बापूसाहेब बोभाटे यांनी आतापर्यंत झालेल्या दिव्यांग साहित्य समेलनांची माहिती देऊन दोन दिवसीय समेलनाचे स्वरूप सांगितले़ उपाध्यक्ष डॉ़ रवींद्र नांदेडकर यांनी दिव्यांगांनी केलेल्या कार्याबद्दल माहिती दिली, तर विश्वस्त सुहास तेंडुलकर यांनी पुढील साहित्य संमेलन हे स्वत:च्या हिमतीवर कोणाचीही मदत न घेता करण्याचे निश्चय करण्याचे आवाहन केले़ संयोजन समितीचे अध्यक्ष सचिन पानमंद यांनी दिव्यांगांच्या स्वतंत्र जनगणनेची माहिती अद्यापही जाहीर करण्यात न आल्याचे तसेच समान हक्क व समान संधी हा कायदा केवळ कागदावरच असल्याचे सांगितले़ यावेळी मान्यवरांच्या हस्ते साहित्य व सांस्कृतिक मंडळाच्या संकेतस्थळाचे प्रकाशन तसेच रामदास म्हात्रे लिखित ‘क्रांती ज्वाला’ या कथा पुस्तकासह मनीषकुमार व मणी पानसे यांच्या नवप्रकाशित साहित्य पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्याध्यक्ष सुनील रुणवाल यांनी, तर आभार भावना विसपुते यांनी मानले़ यावेळी व्यासपीठावर साहित्य सास्कृतिक मंडळा पुणे संस्थेचे सचिव नीलेश छडवेलकर, प्रशासकीय अधिकारी हंसराज पाटील, पांडुरंग भोर आदींसह मान्यवर उपस्थित होते़
ढोल-ताशांच्या गजरात ग्रंथदिंडी
गंगापूर रोडवरील विश्वास लॉन्समध्ये झालेल्या या अखिल भारतीय सातव्या दिव्यांग साहित्य संमेलनाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत ग्रंथदिंडी काढण्यात आली़ स्व़स्टिफन हाँगिग प्रवेशद्वारापासून काढण्यात आलेली ही ग्रंथदींडी विश्वास लॉन्स आवारातून संमेलनस्थळी नेण्यात आली़ या ग्रंथदिंडीमध्ये सागर क्लासेसचे सुनील रुणवाल, प्रशासकीय अधिकारी हंसराज पाटील आदींसह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते़
एकीकडे समाजातील अपप्रवृती, तर दुसरीकडे आपल्या हक्कांसाठी शासनासोबत दिव्यांगांना संघर्ष हा करावाच लागतो़ संघर्षाशिवाय काही मिळत नसल्याने तो दिव्यांगांच्या जीवनाचा अपरिहार्य भागच बनला आहे़ देशभरातील दिव्यांगांचे हे साहित्य संमेलन असून, यानिमित्ताने सर्व एकत्र आले ही सर्वांत महत्त्वाची बाब आहे़ कथा, कविता, कादंबरी या साहित्याची निर्मितीमध्ये दिव्यांग कुठेही कमी नाहीत अर्थात यासाठी अधिक वाचन असावे लागते़ दिव्यांग महिला, युवा यांच्या प्रतिभेतून निर्माण झालेल्या साहित्याच्या एकत्रिकरणाची आवश्यकता आहे़ हे साहित्य समाजाला एक नवीन दिशा नक्कीच देईल़ आत्मविश्वास हीच खरी दिव्यांगांच्या जीवनातील ताकद आहे, तो कधीही डळमळीत होऊ देऊ नका़ - हेमंत टकले, आमदार, विधान परिषद
दिव्यांगांनी नेहेमीच शरीराने धडधाकट असलेल्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे़ दिव्यांगांसमोरील दैनंदिन अडचणी व अपेक्षांची सरकारला जाणीव आहे़ नाशिक महानगरपालिकेत तर दिव्यांगांची नोंदणी करण्यात आली असून, त्यांच्यासाठी राबविण्यात येणाºया विविध उपक्रमांसाठी राखीव निधीची तरतूद करण्यात आली आहे़ महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पातही तशी तरतूदही करण्यात आली आहे़ राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिव्यांगासाठी काढलेल्या अध्यादेशानुसार प्रत्येक आमदाराला दिव्यांगांसाठी दहा लाखांचा निधी मिळणार आहे़ या निधीतून दिव्यांगांना पंधरा हजार रुपयांपर्यंत मदत करता येणार आहे़ - देवयानी फरांदे, आमदार, विधानसभा
देशभरातील सुमारे तीनशेहून अधिक दिव्यांग साहित्यिक या संमेलनात सहभागी झाले असून, हे संमेलन केवळ दिव्यांगांचे नसून ते देशभरातील सर्व साहित्यिकांचे प्रतिनिधित्व करते़ दिव्यांग हा शब्दच स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व सिद्ध करीत असून, दिव्यांग हे शरीराने असले तरी ते आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावर चालतात, बोलतात व लेखनही करू शकतात हे यातून सिद्ध झाले आहे़ साहित्य या एका शब्दामुळे देशभरातील दिव्यांग या ठिकाणी एकत्र आले असून, साहित्याची ही खरी ताकद आहे़
- किशोर पाठक, प्रमख अतिथी तथा कवी