एड्सबाधितांच्या मदतीसाठी दिव्यांगांचा ‘सूर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 01:40 AM2019-01-07T01:40:50+5:302019-01-07T01:42:01+5:30
नाशिक : अपंगत्वाचे आयुष्य जगणारे तसेच काहींना कुष्ठरोगाचा डाग लागलेला असतानाही केवळ सामाजिक कर्तव्यभावनेतून सुमारे ७० दिव्यांग कलावंतांनी एड्सग्रस्तांच्या ...
नाशिक : अपंगत्वाचे आयुष्य जगणारे तसेच काहींना कुष्ठरोगाचा डाग लागलेला असतानाही केवळ सामाजिक कर्तव्यभावनेतून सुमारे ७० दिव्यांग कलावंतांनी एड्सग्रस्तांच्या प्रतिष्ठेसाठी मदतीचे ‘सूर’ छेडले आहेत. विशेष म्हणजे थोर समाजसुधारक बाबा आमटे यांच्या आनंदवनातील हे दिव्यांग कलावंत असून, त्यांना डॉ. विकास आमटे यांनी या कलावंतांचा हा संच उभा केला आहे. सध्या हे कलावंत महाराष्टÑात एड्सग्रस्त मुलांसाठी कलागुण सादर करीत आहेत.
आनंदवनात अनेकविध कारणांमुळे दाखल झालेले अपंग तसेच कुष्ठरोगी आता इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. कुष्ठरोगमुक्त आणि अपंगदेखील समाजासाठी योगदान देऊ शकतात, या भावनेतून डॉ. विकास आमटे यांनी कुष्ठरोगी आणि अपंगांचा वाद्यवृंद स्थापन केला आहे. या वाद्यवृंदातील कलावंत स्वत:साठी याचना करीत नाही तर समाजातील दुर्लक्षित, वंचित आणि पीडितांसाठी कलागुण सादर करीत आहेत. कुष्ठरोगमुक्त आणि अपंग व्यक्तींनी सुरू केलेला हा पहिला वाद्यवृंद मानला जात आहे.
सध्या हे दिव्यांगबांधव अनाथ एड्सबाधित मुले आणि विधवांसाठी समाजाकडे सुरांच्या माध्यमातून याचना करीत आहे. स्वत: दिव्यांग असतानाही आपल्यासाठी नव्हे तर ज्यांच्या समाजप्रतिष्ठेचा आणि समाजमान्यतेचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशा एड्सबाधितांसाठी वाद्य आणि सुरांची बरसात करीत आहेत. हे कलावंत सामान्य कलावंत नाहीत तर कुष्ठरोगमुक्त आणि अपंग आहेत. त्यांच्यावर बाबा आमटे यांचे संस्कार असून, स्वत: डॉ विकास आमटे यांनी या कलावंतांना एकत्र करून पहिला वाद्यवृंद तयार केला आहे. दिव्यांगांंनी वंचितांसाठी कार्य करावे हीच मोठी प्रेरणा आहे.
- डॉ. जयंत वाघ
सामाजिक कार्यकर्ते, आनंदवन