दिवाळी चारशे कोटींची !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2015 11:48 PM2015-11-14T23:48:47+5:302015-11-14T23:49:55+5:30
बाजारपेठेला झळाळी : सोने, वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी उलाढाल
दिवाळी चारशे कोटींची ! बाजारपेठेला झळाळी : सोने, वाहने, कपडे, इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात मोठी उलाढाल नाशिक : दुष्काळाचे सावट असूनही यंदाच्या दिवाळीत शहरातील बाजारपेठा झळाळून निघाल्या. गेल्या आठवडाभरात शहराच्या केवळ कपडे, इलेक्ट्रॉनिक्स, सोने-चांदी व वाहन क्षेत्रात तब्बल चारशे कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यातही अन्य क्षेत्रे व आॅनलाइन विक्रीचा समावेश केलेला नाही. अन्यथा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
यंदाच्या दिवाळीवर महागाई, दुष्काळाचे सावट असले, तरी आठ ते दहा दिवसांपासून शहरात खरेदीसाठी प्रचंड गर्दी
झाली होती. दिवाळीआधी शहरातील बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या.
मेनरोडवर तर पाय ठेवण्यासही जागा नव्हती. पगार व बोनस उशिरा झाल्याने, तसेच सुटी नसल्याने बऱ्याच जणांची खरेदी रखडली होती; मात्र वसूबारसनंतर तिला वेग आला. वसूबारस व धनत्रयोदशी या दोन सणांच्या मध्ये आलेल्या रविवारीही नागरिकांनी सकाळपासून घराबाहेर पडत मनमुराद खरेदी केली. दिवाळीत कपडे, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने-चांदी व वाहन या क्षेत्रांत सर्वाधिक उलाढाल होते. यंदाच्या दिवाळीत कपड्यांच्या बाजारपेठेत सुमारे ५० कोटी, इलेक्टॉनिक्स बाजारात ६० कोटी, सराफी पेढ्यांमध्ये २०० कोटी, तर आॅटोमोबाइल क्षेत्रात सुमारे ९० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला.
ओघ कायम