दिवाळी शुभेच्छांचे ग्रिटिंग कार्ड झाले हद्दपार
By admin | Published: October 20, 2016 01:58 AM2016-10-20T01:58:17+5:302016-10-20T02:00:57+5:30
भ्रमणध्वनीचा प्रभाव : भेटकार्डची जागा घेतली लघुसंदेश आणि व्हॉट्स अॅपने
नाशिक : पूर्वी दिवाळी म्हटल्याबरोबर फराळ, फटाके, नवीन कपडे या साऱ्या गोष्टींबरोबरच आकर्षक रंगसंगतीतले लहान-मोठ्या आकाराचे, अर्थपूर्ण मजकूर असणारे ग्रिटिंग कार्ड डोळ्यासमोर येत. आपल्या जीवलगांनी, आप्तस्वकीयांनी पोस्टाद्वारे, कुरिअरद्वारे, स्वत: भेटून दिलेले ग्रिटिंग कार्ड्स वर्षानुवर्षे सांभाळून ठेवली जात.
वारंवार ते काढून पाहिले जायचे, आठवणींना उजाळा दिला जायचा. सोशल मीडियाच्या जगात आता हे ग्रिटिंग कार्ड हद्दपार झाले असून, एकेकाळी ८०-९० टक्के असणारी ग्रिटिंग कार्डची मागणी केवळ पाच टक्क्यावर आली आहे. ग्रिटिंग कार्ड देणाऱ्यांनीच प्रमाण कमी केल्यामुळे आता ग्रिटिंग कार्ड बनविणारे, संदेश लिहिणारे (कॉपीरायटर), ग्रिटिंग कार्ड विकणारे या साऱ्या साखळीवरच त्याचा परिणाम झाला असून आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. ग्रिटिंग कार्डची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना आता गिफ्ट आयटम्स ठेवून इतर पर्यायांचा विचार करावा लागत आहे.
पूर्वीच्या काळी दिवाळीच्या खर्चात ग्रिटिंग कार्ड्स खरेदी, पोस्टिंगचा खर्च याचे सेपरेट बजेट बाजूला काढून ठेवावे लागायचे. दिवाळीच्या एक-दोन दिवस आधी ग्रिटिंग कार्ड समोरच्याला मिळेल, असे नियोजन करून तिकीट लावून, व्यवस्थित पत्ता टाकून ग्रिटिंग पाठविले जायचे. मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांना तर ग्रिटिंग कार्ड दिले जायचेच पण व्यावसायिक हितसंबंध दृढ करण्यासाठी विविध कार्यालये, कंपन्या, बॅँका, लहान-मोठ्या संस्था यांच्याकडूनही मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्डची देवाणघेवाण केली जायची.
विविध सामाजिक संस्था, बचतगट हेदेखील मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्ड बनवून विकत असायचे. त्या संस्थांना आर्थिक मदत करायची या पवित्र हेतूने त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ग्रिटिंग कार्ड खरेदी केले जायचे. ग्रिटिंग कार्डमध्ये कल्पकता, पर्यावरणपूरक साहित्याचा वापर आदि विविध गोष्टींचा विचार केलेला असायचा. मात्र आता सोशल मीडियाद्वारे दिवाळीच्या शुभेच्छा देण्याचे काम सुलभ, स्वस्त, बरेचदा तर फुकट, जलद झाले असल्याने अबालवृद्धांनी पारंपरिक ग्रिटिंग कार्ड्सना बाय बाय करीत व्हॉट्स अप, एसएमएस, ट्विटर, इन्स्ट्राग्राम, फेसबुक, मेसेंजर यांना आपलेसे केले आहे.
सोशल मीडियाचा विस्तार होण्याआधी व मोबाइल जगतात क्रांती झाल्यानंतर दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी लोक स्वस्तातल्या बल्क एसएमएसला प्राधान्य देत होते. आता हे एसएमएसही मागे पडत चालले असून व्हॉट्स अप, फेसबुक आदि सोशल मीडियाने त्याची जागा घेतली आहे. एकेकाळी आपले वर्चस्व टिकवून ठेवणाऱ्या ग्रिटिंग कार्ड्सना आता घरघर लागली आहे. (प्रतिनिधी)