‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

By admin | Published: October 19, 2014 09:32 PM2014-10-19T21:32:25+5:302014-10-20T00:07:48+5:30

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

'Diwali' in his hometown ... | ‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

‘त्यांच्या’ वस्तीतली दिवाळी माणूसपण जागवणारी...

Next

 

सुदीप गुजराथी

नाशिक
‘त्यांच्या’ वस्तीतल्या अरुंद गल्ल्यांमधले वातावरण जरासे उजळून निघते... कोंदट, अंधाऱ्या खोल्यांमध्ये पणत्यांचा प्रकाश पसरतो... त्यातल्याच एखाद्या खोलीत चक्क लक्ष्मीची पूजा मांडली जाते... मग ‘मालकीण’ हिंदू असो की मुस्लीम, दुनियेने निर्माण केलेल्या धर्माच्या, भेदभावाच्या भिंती इथे गळून पडतात अन् ‘त्यांची’ दिवाळी माणूसपणाने झळाळून निघते...
हे वर्णन आहे शहरातील वेश्यावस्त्यांमध्ये साजऱ्या होणाऱ्या दिवाळीचे... समाजातली अन्य माणसे जेव्हा दिवाळीचा सण साजरा करण्यात रममाण झालेली असतात, तेव्हा परिस्थितीमुळे या व्यवसायात आलेल्या वेश्यांच्या वस्तीतही माणुसकीचे दिवे पेटलेले असतात... काही दिवसांसाठी का होईना, या महिलांच्या अंधारलेल्या आयुष्यात थोडासा उजेड आलेला असतो...
नाशिक शहरात सात ते आठ ठिकाणी वेश्यांची वस्ती आहे. तेथे सुमारे सातशे ते आठशे महिला देहविक्रयाचा व्यवसाय करतात. (सामाजिक कार्यकर्त्यांच्या मते, शहरात सुमारे दोन ते अडीच हजार महिला या व्यवसायात आहेत; मात्र त्यांचा व्यवसाय छुप्या पद्धतीने सुरू असतो.) प्रत्येक वस्तीत अनेक खोल्या असलेल्या एकेका घरात सुमारे पन्नास-साठ महिला व्यवसाय करतात. एका महिलेच्या वाट्याला ‘नंबर’प्रमाणे दिवसातून दोन किंवा तीन ‘गिऱ्हाइके’ येतात. त्यातून तिला साधारणत: तीनशे रुपयांची कमाई होते. त्यातला काही भाग घरमालकिणीला द्यावा लागतो. वस्तीतल्या काही महिला तेथेच वास्तव्यास असतात, तर काही आपल्या घरून व्यवसायासाठी तेथे येतात. सकाळी ७ वाजेपासून ते रात्री १ पर्यंत व्यवसाय चालतो.
दिवाळीच्या दिवसांत या वस्त्यांचे रूप थोडेफार बदलते. कुटुंबीय स्वीकारत असल्यास काही महिला सणाला घरी जातात. इतरांची दिवाळी मात्र वस्तीतच साजरी होते. तेथे साजऱ्या होणाऱ्या दिवाळीबद्दल या महिला भरभरून बोलतात, ‘दुनियेच्या दिवाळीची आम्हाला पर्वा नाही. आम्ही आमच्या परीने हा सण साजरा करतो. नवे कपडे घेतो, फराळाचे पदार्थ तयार करतो. इथे सगळ्या जाती-धर्मांच्या महिला राहत असल्या, तरी साऱ्या जणी सारख्याच उत्साहात दिवाळी साजरी करतात. इथल्याच एखाद्या घरात लक्ष्मीपूजन केले जाते. फटाकेही फोडतो. वस्ती हे आमचे कुटुंबच असते. त्यामुळे हक्काचे घर असले, तरी तिथल्यापेक्षा येथेच जास्त आनंद मिळतो...’
समाजाकडून वेश्यांना अनेक दूषणे दिली जात असली, तरी या महिला मात्र समाजाविषयी चकार शब्दाचीही तक्रार करीत नाहीत... ‘आम्हीच असे काम करतो, लोकांना नावे कशाला ठेवू? लोक आमच्याशी चार शब्द गोड बोलतात, हेच खूप झाले... लोकांकडून आम्हाला दुसरे काहीही नको’, असे या महिला प्रामाणिकपणे सांगतात, तेव्हा त्यांचे हे शब्द त्यांच्यातल्या सच्चेपणाबरोबरच आयुष्याकडून त्यांना किती कमी अपेक्षा आहेत, याचीही जाणीव करून देतात...

Web Title: 'Diwali' in his hometown ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.