दिवाळीच्या सुटीत घरफोडीची धास्ती
By Admin | Published: October 27, 2016 12:34 AM2016-10-27T00:34:29+5:302016-10-27T00:34:55+5:30
आपणच व्हा पहारेकरी : बाहेरगावी जाणाऱ्या कुटुंबांवर चोरट्यांची नजर, पोलिसांची उपाययोजना
नाशिक : नोकरी, व्यवसायानिमित्त शहरात स्थायिक झालेले वा वास्तव्य करणारे बहुतांशी नागरिक दिवाळीचा सण हा आपल्या मूळ गावी साजरा करतात़ मात्र, गावी जाताना घराच्या सुरक्षिततेबाबत काळजी न घेतल्याने मोठ्या संख्येने घरफोडी व चोरीच्या घटना घडतात़ या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल यांनी उपाययोजना केल्या असून, बाहेरगावी जाणाऱ्या नागरिकांनीही संबंधित पोलीस ठाण्यास माहिती देण्याचे आवाहन केले आहे़ पोलीस गस्त व घराच्या सुरक्षिततेच्या उपाययोजनांमुळे गावाहून परतल्यानंतर नागरिकांचा दिवाळीचा आनंदही टिकून राहणार आहे़
दिवाळीनिमित्त अनेक नागरिक गावी जातात़ या कालावधीत चोरटे या संधीचा फायदा घेत त्यांच्या बंद घराच्या दरवाजांचे कुलूप तोडून, खिडक्या तोडून चोरटे मौल्यवान व सोन्याचे दागिने, रोख रक्कम तसेच गृहोपयोगी वस्तू घरफोडी करून चोरून नेतात़ शहरातून गावी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना करणे गरजेचे आहे़ गावी जाण्यापूर्वी शेजारी राहणारे तसेच संबंधित पोलीस ठाण्यास माहिती देणे, सोसायट्यांमधील नागरिकांनी संवादावर भर देणे, सुरक्षारक्षक ठेवणे, सीसीटीव्ही कॅमेरे लावणे आवश्यक आहे़
पोलीस आयुक्तालयात काही दिवसांपूर्वीच घरफोडी व चोरीसंदर्भात बैठक घेण्यात आली होती़ या बैठकीनंतर पोलीस आयुक्तांनी बिट मार्शलच्या दिवसा व रात्रीच्या गस्तीत वाढ केली आहे़ या बिट मार्शलकडे वायरलेस सेट आणि रिव्हॉल्वर असते. विशेष पथके नेमून रात्रीचे पेट्रोलिंगही वाढविण्यात आले आहे. रात्रीच्या वेळी संशयास्पद आढळणाऱ्या व्यक्तींची चौकशी केली जाते़ तसेच नाकेबंदी, फि क्स पॉइंटद्वारे वाहनांची तपासणी केली जाते़ बाहेरगावी जाताना आपल्या घराच्या सुरक्षिततेसंदर्भात नियमित आढावा घेणेही तितकेच गरजेचे आहे़
पोलिसांकडून कारागृहातून जामिनावर सुटलेले घरफोडी व जबरी चोरी करणारे अट्टल गुन्हेगार, तडीपार यांच्यावर वॉच ठेवून त्यांची नियमित तपासणी सुरू करण्यात आली आहे़ शहरातील नागरिकांनीही बाहेरगावी गेलेल्या आपल्या शेजाऱ्याची घरावर लक्ष ठेवावे, तसेच परिसरात काही संशयास्पद हालचाली आढळून आल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे़ (प्रतिनिधी)
या सुरक्षितता आवश्यक...
दरवाजाला लॅच बसविले किंवा कुलूप लावले म्हणजे घर सुरक्षित झाले, असा लोकांचा गोड समज आहे. परंतु , ही लॅच आणि कुलपे तकलादू असतात. दरवाजाच्या फ्रेममध्ये लॅच किती आत जाते, याची कधीही तपासणी केली जात नाही़ त्यामुळे दरवाजावर जोरात लाथ मारली तरी लॅच उखडते़ कुलूप उघडण्यासाठी चावी आवश्यक असली तरी कुलपाची कडी दरवाजावर अवघ्या एक ते दीड इंचाच्या स्क्रूने बसविलेली असते. कटावनीचा एक जोरदार हिसका दिला की कडी कुलपासकट उचकटते. याबरोबरच सेफ्टी डोअरचे बोल्टही कुचकामी असतात. त्यामुळे दरवाजा वा कुलूप उचकटून घरात शिरणे चोरांना सहज शक्य होते. घराच्या दरवाजावर ठरावीक तारखेपर्यंत दूध आणि पेपर टाकू नका, अशी चिठ्ठी लिहून ठेवली जाते़ त्यामुळे या घरात काही दिवस कुणीही नाही, हे चोरांना सहजगत्या कळते. तिजोरीच्या चाव्या कपाटाच्या ड्रॉवरमध्ये, गादीखाली, हँगरला अडकविलेल्या किंवा शर्टच्या खिशात ठेवलेल्या असतात. या जागाही चोरांना पक्क्या माहीत असल्याने त्यांचे काम सोपे होते.