पिंपळपारावर 'मधु'र स्वरांची बरसात !
By धनंजय रिसोडकर | Published: October 26, 2022 11:25 AM2022-10-26T11:25:11+5:302022-10-26T11:25:42+5:30
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव मानले जाणारे मानले जाणाऱ्या ज्येष्ठ गायक आणि पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य पंडित मधूप मुद्गल यांच्या तरल शास्त्रीय गायनाने पिंपळपारावर रंगली
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : तिन्ही सप्तकात फिरणाऱ्या स्वरांच्या जादूची अनुभूती पं.मधूप मुद्गल यांच्या नजाकतपूर्ण गायकीने रसिकांना करून दिली . नेहरू चौकातील पिंपळपारावरील पिंपळाचे प्रत्येक पान आणि रसिक मनाचा प्रत्येक कोपरा स्वर लहरींनी बहरून गेला, आणि दिवाळी 'पाडवा पहाट' च्या शास्त्रीय संगीत मैफलीचा स्वर्गीय आनंद रसिकांनी अनुभवला.
हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील मोठे नाव मानले जाणारे मानले जाणाऱ्या ज्येष्ठ गायक आणि पं. कुमार गंधर्व यांचे शिष्य पंडित मधूप मुद्गल यांच्या तरल शास्त्रीय गायनाने पिंपळपारावर रंगली . शाहू खैरे यांच्या पुढाकाराने संस्कृती, नाशिक यांच्यातर्फे आयोजित मैफिलीला रसिक प्रेक्षकांची भरभरून दाद मिळाली . पहाटे साडेपाच वाजता सुरू झालेला ही शास्त्रीय संगीताची मैफल मुद्गल यांच्या यमन रागातील ख्याल गायनाने रंगली. त्यानंतर पिंपळपार आणि गोदातीरी असलेल्या रसिकांना सूर्यकिरणांच्या साक्षीने पंडितजींनी त्यांच्या भैरवातील ऋषभ आणि कोमल धैवतामुळे साऱ्या आसामंतात एक प्रकारची प्रसन्नता निर्माण झाल्याची अनुभूती रसिकांनी अनुभवली. 'दिन गये सुखके स्मृती पटल पर' या बंदीशीतील बडा ख्याल आणि त्यातील सौम्य अशी रागदारी पंडित मुद्गल यांच्यावर कुमार गंधर्वांचे असलेले संस्कार स्पष्टपणे समोर आले. अर्ध्या तासांच्या या ख्यालानंतर पं. मुद्गल यांनी तोडीतील 'शोभे जटा तेरे शंभो' या बंदिशीतून भगवान शंकराच्या विविध रूपांचे दर्शन रसिकांना घडविले. हिमालयातील महादेवाच्या आराधनेसाठी वसलेल्या गणांचा स्वर पं. मुद्गल यांच्या तोंडून बाहेर पडत होता, असा भास यावेळी झाला. याच बंदिशेतून खऱ्या अर्थाने पं.मुदगल यांच्या शास्त्रीय गाण्याचा समा बांधला. मध्यंतराआधी संत कबीर यांचे निर्गुणी परंपरेतील 'राम के गुण लडी रे' या भजनाने तर रसिक तल्लीन झाले होते.
मध्यंतरानंतर पंडित मुदगल यांच्या विभास रागातील 'कान्हा मुझे लगी लगन, मन मे आस बिठाई' या बंदिशीचा विस्तार करीत पंडित मुद्गल यांनी शास्त्रीय गायनातील विविध अंगांचे दर्शन घडवले. संत कबीर यांच्या भजनाने भैरवी सादर करीत पंडित मुद्गल यांनी पिंपळपारावरील स्वरमैफलीचा समारोप केला. त्यांना हार्मोनियमवर डॉ. अरविंद थत्ते आणि तबल्यावर शंभुनाथ भट्टाचार्य यांची तितकीच तोलामोलाची साथ दिली. तानपुऱ्यावर कुशल शर्मा आणि केतन इनामदार यांनी स्वरसाथ केली.कार्यक्रमाचे संचालन पीयू शिरवाडकर - आरोळे यांनी केले. जवळपास तीन तास चाललेला या शास्त्रीय संगीताची मैफल शेकडो रसिकांनी अनुभवली.