दिवाळीचा दिलासा : कुणाची सोनसाखळी तर कुणाची बाईक, मोबाईल असा चोरीला गेलेला ५६ लाख ६२ हजारांचा मुद्देमाल नाशिककरांना पोलिसांकडून समारंभपुर्वक प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2017 02:32 PM2017-10-14T14:32:52+5:302017-10-14T14:40:15+5:30
मुंबईनाका, सरकारवाडा,आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, गंगापूर, सातपूर, अंबड, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी आज समारंभपूर्वक प्रदान केल्या
नाशिक : जेव्हा एखादी वस्तू घरातून अथवा रस्त्यावरून चोरीला जाते तेव्हा, ती वस्तू पुन्हा हातात येईल, याबाबत फारसा कोणालाही विश्वास नसतोच...पोलीस ठाण्यात जरी तक्रार दिली तरी त्याचा शोध कधी लागेल किंवा लागणारही नाही.... शोध लागला तरी न्यायिक प्रक्रिया कधी होईल, आणि त्या मौल्यवान वस्तू क धी हातात येईल... अशा विविध शंका व प्रश्नांचे सर्वसामान्यांच्या मनात काहूर उठलेले असते. शहरात घडलेल्या सोनसाखळी, मोबाईल, दुचाकी तसेच आर्थिक गुंतवणूकीमध्ये झालेली फसवणूक अशा विविध प्रकारच्या गुन्ह्यांचा छडा नाशिकच्या पोलीस पथकाने लावत गुन्हेगारांना गजाआडही केले आणि त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला. मुंबईनाका, सरकारवाडा,आडगाव, पंचवटी, म्हसरूळ, भद्रकाली, गंगापूर, सातपूर, अंबड, उपनगर, नाशिकरोड, देवळाली कॅम्प अशा विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यांचा तपास पूर्ण करुन संबंधित तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू पोलिसांनी आज समारंभपूर्वक प्रदान केल्या. एकूण ५६ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल यावेळी तक्रारदार नाशिककरांना परत मिळाला. नाशिक पोलिसांनी धनत्रयोदशीच्या दोन दिवस अगोदर मुद्देमाला संबंधितांना देत दिवाळीचा दिलासा देत त्यांचा आनंद द्विगुणित केला.
नाशिकमधील गंगापूररोड येथील रावसाहेब थोरात सभागृहात आयोजित कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून आमदार देवयानी फरांदे, विशेष सरकारी वकिल अजय मिसर यांच्यासह पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र कुमार सिंगल, उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, श्रीकृष्ण कोकाटे, माधुरी कांगणे, विजय मगर, सहाय्यक आयुक्त सचिन गोरे, राजू भुजबळ आदि मंचावर उपस्थित होते.
दरम्यान मान्यवरांच्या हस्ते, २३ लाख ४६ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिणे, २५ लाख ५५ हजार रुपये किंमतीच्या दुचाकी-चारचाकी वाहने, दोन लाख ३२ हजार ९०० रुपयांचे मोबाइल, तसचे ५ लाख २७ हजार ९६५ रुपयांचा इतर मुद्देमाल असा एकूण ५६ लाख ६२ हजार ४०५ रुपयांचा मुद्देमाल तक्रारदारांना वाटप करण्यात आला आहे. यावेळी ‘गावकरी’च्या गुन्हयातील ७८ ठेविदारांचे बुडालेले १५ लाख तीन हजार ३३३ रुपयांच्या ठेवींची वाटप प्रक्रिया सुरू आहे. यापैकी काही ठेविदारांना डीमांड ड्राफ्टचे वाटप करण्यात आले. एकूण ६५ तक्रारदारांना त्यांच्या चोरीला गेलेल्या वस्तू परत मिळाल्या.