वाघदेवतेच्या पूजेने सुरु होते आदिवासींची दिवाळी
By admin | Published: October 25, 2016 11:30 PM2016-10-25T23:30:45+5:302016-10-25T23:31:19+5:30
वाघदेवतेच्या पूजेने सुरु होते आदिवासींची दिवाळी
कळवण : दिवाळी सण आदिवासी समाजात आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची परंपरा आजही टिकून असून, कळवण या आदिवासी, दुर्गम व अतिदुर्गम तालुक्यातील कोकणा, भिल्ल, महादेव कोळी या जमातीचे समाजबांधव दिवाळीची सुरुवात वाघबारशीने (वसूबारस) करतात. हिंदू धर्मात दिवाळी हा अत्यंत महत्त्वाचा सण म्हणून ओळखला जातो. दिवाळी म्हटली की गोडधोड पदार्थ, नवीन कपड्यांची खरेदी, फटाक्यांची आतषबाजी, लक्ष्मीपूजन असा हा आंदोत्सवाचा सण आहे.
परंतु हाच दिवाळीचा सण आदिवासी समाजात अतिशय वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याची रूढी-परंपरा अजूनही कायम आहे. कळवणसारख्या आदिवासीबहुल तालुक्यातील कोकणा, भिल्ल, महादेव कोळी या जमातीचे आदिवासी बांधव दिवाळीची सुरुवातच वाघबारशीने (वसूबारस) करतात. कळवण तालुक्यातील बोरदैवत, देवळीवणी, चिंचोरे या तीन गावांच्या शिवाराच्या सरहद्दीवर असलेल्या वाघदेवाच्या नावाने तर गेल्या कित्येक वर्षांपासून चक्क भव्य अशी यात्राच भरते.
वसूबारसेच्या म्हणजे आदिवासींच्या वाघबारशीच्या दिवशी गुरे चारणारे गुराखी (बाळदी) नेहमीप्रमाणे गायी चारण्यासाठी जंगलात जातात. या दिवशी सर्व गुराखी उपवास करतात. दुपारी या तिन्ही गावांतील भगत व ग्रामस्थ गावाच्या सीमेवर असलेल्या वाघदेवाजवळ जमा होतात. आदिवासी परंपरेनुसार प्रत्येक गावाच्या सीमेवर वाघदेवाच्या मूर्तीची दगडावर तथा चिऱ्यावर स्थापना केलेली आढळते. याला वाघदेवाचा चिरा किंवा पाटली असे संबोधले जाते. या वाघदेवाच्या पाटलीवर, चिऱ्यावर चंद्र, सूर्य, नागदेव, वाघदेव, मोर आदि चित्रे कोरलेली असतात. (वार्ताहर)