आदिवासींची दिवाळी, होळी रे होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 12:21 AM2018-03-01T00:21:20+5:302018-03-01T00:21:20+5:30
आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा शिमगा म्हणजे होळी सण. आदिवासी भागात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व असलेल्या होळी या सणाच्या आनंदात रंगून जाण्यासाठी वर्षभर रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी मजूर आपापल्या गावाकडे परतले आहेत.
पेठ : आदिवासी बांधवांचा सर्वात मोठा समजला जाणारा शिमगा म्हणजे होळी सण. आदिवासी भागात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. दिवाळीपेक्षाही अधिक महत्त्व असलेल्या होळी या सणाच्या आनंदात रंगून जाण्यासाठी वर्षभर रोजगारासाठी स्थलांतरित झालेले आदिवासी मजूर आपापल्या गावाकडे परतले आहेत. होळी सणाच्या दोन दिवस आधी पेठ शहरात यात्रेचे आयोजन केले जाते. तालुक्यात होळी सण दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. कामानिमित्त मायभूमीपासून दूर गेलेले चाकरमाने, मजूर सण जवळ येताच गावाकडे परततात. पूर्वी पेठ येथे आठ दिवस यात्रा भरत असे. त्यामागे काही भौगोलिक कारणेही होती. तालुक्यात पूर्वीच्या काळी गावे व पाड्यापर्यंत पोहोचण्यासाठी पक्के रस्ते नव्हते. तालुक्यातील पर्जन्यमान दोन हजार मी.मी.पेक्षा जास्त असल्याने खेड्यापाड्यांचा तालुक्याच्या गावाशी तसा जास्त संपर्क येत नसे. त्यामुळे वर्षातून एकदा यात्रेचे आयोजन केले जात असे. आदिवासी बांधव पावसाळ्याच्या चार महिन्यांसाठी लागणाºया वस्तूंची खरेदी या यात्रेतच करत असे. कालांतराने खेडोपाडी दळणवळणासाठी पक्के रस्ते झाले. वाहतु-कीची साधने आली. स्थानिक बेरोजगार तरुणांनी किराणा व्यवसायाला सुरुवात केली. यामुळे दुर्गम भागातही गरजेच्या वस्तू उपलब्ध होऊ लागल्याने यात्रेचा कालावधी वर्षागणिक कमी कमी होत गेला. कालानुरूप बंद होत असलेली तमाशाची लोककला अखेरच्या घटका मोजत असूनही हे कलावंत हजेरी लावत आपली कला सादर करतात.
जीवनावश्यक वस्तूंची साठवणूक
होळी सणाला भरणाºया पेठच्या यात्रेत महाराष्ट्र व गुजरात राज्यातून जवळपास शंभर गावे व वाडी वस्त्यांवरील ग्रामस्थ येत असल्याने जीवनावश्यक वस्तंूसह चैनीच्या वस्तूंची मोठ्या प्रमाणावर खरेदी-विक्र ी होत असते. आदिवासी बांधव याच यात्रेतून आपल्या कुटुंबासाठी आवश्यक लसून, कांदा व किराणामालाची वर्षभराची साठवणूक करून ठेवतात.