पीडितेसह आई फितूर होऊनही डीएनए अहवाल ठरला कळीचा मुद्दा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:11 AM2021-07-24T04:11:37+5:302021-07-24T04:11:37+5:30
स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करून गरोदर करणाऱ्या पित्यास निफाडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवित ...
स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीवर वारंवार अत्याचार करून गरोदर करणाऱ्या पित्यास निफाडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने दोषी ठरवित आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलीसह तिची आईदेखील फितूर होऊनही संशयित व पीडित मुलीचा डीएनए चाचणी अहवाल दोषीला शिक्षा सुनावण्यास पुरेसा ठरल्याने हा निकाल महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
श्रावण ऊर्फ वाळिबा लहानु गायकवाड (३४, रा पिंपळगाव निपाणी, ता. निफाड) याने स्वत:च्या सोळा वर्षीय सावत्र मुलीला शेतात गवत आणण्यासाठी नेऊन जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केले. पीडित मुलीची मासिक पाळी थांबल्याने तिच्या आईने तिला तपासणीसाठी डाॅक्टरांकडे नेल्यावर ती गरोदर असल्याची बाब पुढे आली. त्यानंतर पीडितेस जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. त्याठिकाणी पीडितेने सावत्र बापानेच क्रुरकर्म केल्याचे पोलिसांना सांगितले. त्यावरून सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये ३७६ (२), एफएन ५०६ ,बाललैंगिक अत्याचार कायदा कलम ३ ,६ अन्वये गुन्हा नोंदवून संशयितास अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान पीडित मुलीसह तिच्या गर्भाचे व नराधम पित्याचे नमुने डीएनए नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर पीडितेसह तिच्या आईचे जबाब न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदविण्यात आले होते. आरोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे सहायक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी तपास अधिकारी पोलीस निरीक्षक अंबादास मोरे, रामचंद्र कर्पे ,डीएनए अहवाल तपासणी करणाऱ्या डाॅ. वैशाली महाजन यांच्यासह १६ साक्षीदारांची साक्ष नोंदविली. न्यायालयासमोर आलेल्या साक्षी पुराव्यावरून आरोपी पित्यानेच आपल्या सावत्र मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची बाब निष्पन्न झाली. आरोपी गायकवाड यास आजीवन सश्रम कारावास व दहा हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास तीन महिने सश्रम कारावास अशी शिक्षा सुनावली आहे.
इन्फो...
पीडितेसह आईदेखील झाली होती फितूर
सदर खटल्यातील पीडितेने न्यायालयासमोर साक्ष नोंदविताना सरकारी पक्षाला सहकार्य केले नाही. ती व साक्षीदार आईदेखील फितूर झाली; मात्र आरोपी व पीडितेच्या गर्भातील नमुने डीएनए नमुन्यांची तपासणी केली असता, ते पाॅझिटिव्ह आले. हा अहवाल व पोलिसांनी केलेला तपास यांचे परस्परपुरक धागेदोरे या आधारावर पित्यास न्यायालयाने दोषी ठरवत शिक्षा सुनावल्याचे सहायक जिल्हा सरकारी वकील रामनाथ शिंदे यांनी सांगितले.