मानसिक दु:खातून मुक्ती देणारा ग्रंथ ‘ज्ञानेश्वरी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2018 12:27 AM2018-09-10T00:27:12+5:302018-09-10T00:27:18+5:30
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.
नाशिक : संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी अठरापगड जातीच्या लोकांपुढे वाचली आहे. ज्ञानेश्वरीकडे बघताना एक दृष्टी हवी. गीता, ज्ञानेश्वरी हे महान ग्रंथ समजून घेण्यासाठी अर्जुन होण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. ज्ञानेश्वरीच्या सहवासात आल्यानंतर मनुष्य दु:खी जीवन जगणे विसरून जातो, असे प्रतिपादन संत साहित्याचे अभ्यासक व लेखक वामन देशपांडे यांनी केले.
ज्योती स्टोअर्स व शंकराचार्य न्यासाच्या सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित लेखक तुमच्या भेटीला या व्याख्यानमालेचे पुष्प रविवारी (दि.९) देशपांडे यांनी ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ या विषयावर गुंफले. शंकराचार्य संकुलातील कुर्तकोटी सभागृहात झालेल्या या व्याख्यानाचे प्रारंभी प्रा. डॉ. उन्मेश कुलकर्णी संकलित श्री संत गजानन महाराजांची शिकवण या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर राजेंद्र विद्वांस, प्रज्ञा कुलकर्णी उपस्थित होते. २००१साली देशपांडे यांनी ज्ञानोबा माउलींच्या निवडक अशा शंभर अभंगांवर भाष्य करीत ‘ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण’ हे चरित्र लिहिले आहे. त्यांनी या चरित्रलेखनाचा अनुभव सांगताना ज्ञानेश्वरीतील विविध अध्याय आणि अभंगांमधील ओवींचे विश्लेषण केले. यावेळी ते म्हणाले, ज्ञानेश्वरी तास, दोन तासांत सांगण्याचा मुळीच विषय नाही. मला ज्ञानेश्वरीच्या या निवडक अभंगांवर भाष्य करण्यास सुमारे साडेपाच महिन्यांचा कालावधी लागला.
या रूपाने मला ज्ञानदेवांना अक्षररूपी प्रदक्षिणा घालण्याची संधी भगवंताने दिली ज्ञानेश्वरी माझा श्वास असून, ज्ञानेश्वरी वाचताना माउलींचा उपदेश व त्याची महती सहज लक्षात येते, असे देशपांडे यावेळी म्हणाले.